बेळगाव लाईव्ह :भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील अनेकांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. बेळगावचे अनेक स्थानिक लोक 9 ऑगस्ट 1942 रोजी ‘भारत छोडो’ चळवळीत सहभागी झाले होते. आजचा 9 ऑगस्ट हा दिवस त्यांचे स्मरण करण्याचा आहे. स्वातंत्र्य लढ्यातील तत्कालीन सर्वांच्या योगदानाचा सन्मानार्थ त्याकाळी बेळगाव शहरात ‘हुतात्मा स्मारक’ उभारण्यात आले. देशभक्तीची ज्योत तेवत ठेवणारे हे स्मारक आज देखील भावी पिढीला प्रेरणा देते आणि हुतात्म्यांच्या बलिदानातून शक्ती व ऊर्जा मिळवण्याचे आवाहन करते.
बेळगाव शहरातील किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली आणि कडोलकर गल्ली यांच्या जंक्शनवरील शहीद स्मारक अर्थात हुतात्मा स्मारक हे बलिदान आणि देशभक्तीचे प्रतीक आहे. जे 1048 पूर्वी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी बांधले होते. बेळगाव शहर आणि जिल्ह्यातील अनेक लोकांनी ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी हे स्मारक उभारण्यात आले, जे आजही आपल्या भूतकाळाची एक शक्तिशाली आठवण म्हणून दिमाखात उभे आहे. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत बेळगाव हे एक महत्त्वाचे केंद्र होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी 1942 मध्ये बेळगावात 9 दिवस राहिले होते. कार्यकर्त्यांच्या सहा महिन्यांच्या अथक प्रयत्नांमुळे त्या काळात बेळगावमध्ये मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, लाला लजपत राय, अॅनी बेझंट, सरोजिनी नायडू आणि इतर अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश असलेला काँग्रेस मेळावा झाला. बेळगावचे अनेक स्थानिक लोक त्यावेळी म्हणजे 9 ऑगस्ट 1942 रोजी ‘भारत छोडो’ चळवळीत सहभागी झाले होते. त्यानंतर कर्नाटक सिंह गंगाधरराव देशपांडे, जीवनराव याळगी, जयदेवराव कुलकर्णी आणि श्रीराम कामत यासारख्या प्रमुख व्यक्तींनी आणि स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या अनेकांनी स्वतःच्या संसाधनांनी बेळगावमध्ये शहीद स्मारक बांधले. सुरुवातीला उंचीने कमी असलेल्या या स्मारकासाठी 1952 मध्ये स्वातंत्र्योत्तर काळात बेळगाव नगरपालिकेने विकासासाठी अनुदान वाटप केले. त्या अनुदानातून या स्मारकाचा विकास व विस्तार करण्यात आला. आज हुतात्मा स्मारक हे केवळ एक ऐतिहासिक स्मारक राहिलेले नसून प्रेरणेचा स्रोत बनले आहे, जे सर्वांना आपल्या हुतात्म्यांच्या बलिदानातून शक्ती आणि ऊर्जा मिळविण्याचे आवाहन करते. देशभक्तीची ज्योत तेवत ठेवा. चला हुतात्म्यांच्या वारशाचा सन्मान करूया आणि त्यांचा आत्मा तेवत ठेवूया.





