बेळगाव लाईव्ह :श्री गणेश चतुर्थीसह श्री गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पुरेसा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एकंदर श्री गणेशोत्सव सुरळीत व शांततेने पार पडावा यासाठी आवश्यक पूर्वखबरदारीच्या उपायोजना केलेल्या आहेत, अशी माहिती बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दिली.
श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. पोलीस आयुक्त बोरसे यांनी सांगितले की, शहरातील पोलीस बंदोबस्तासाठी परगावाहून देखील पोलीस अधिकारी व पोलिसांची कुमक मागविण्यात आली आहे. श्री गणेशाच्या आगमन सोहळ्यांसह प्रत्येक सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला जाईल. उत्सव सुरळीत पार पडावा. यासाठी नियुक्त पोलीस पथकांकडून सेक्टर पेट्रोलिंग केले जाईल. शहरातील संवेदनशील ठिकाणी 24 तास पोलिसांचा जागता पहारा असेल.
एकंदर हा श्री गणेशोत्सव सुरळीत व शांततेने पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक पूर्वखबरदारीच्या उपायोजना केलेल्या आहेत, अशी माहिती देऊन सोशल मीडियावर कोणी जर प्रक्षोभक पोस्ट टाकल्यास किंवा अफवा पसरवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, श्री गणेशोत्सव काळातील सुरक्षितता आणि खबरदारीसाठी पोलिसांचा सुमारे अडीच हजार इतका मोठा फौज फाटा शहरात पुढील 11 ते 12 दिवस तैनात असणार आहे. पोलिसांच्या बंदोबस्तात बेळगाव शहर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस उपायुक्त, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, महिला पोलीस, पोलीस कर्मचारी, एसआरपीएफ, केएसआरपी आणि होमगार्डस् यांचा समावेश असणार आहे.
श्री गणेशोत्सव काळात शहरावर सीसीटीव्ही कॅमेराद्वारे 24 तास लक्ष ठेवले जाणार आहे. महत्त्वाच्या मार्गांवर ड्रोन कॅमेऱ्याची गुड्डाणे करून गर्दीवर देखरेख ठेवले जाणार आहे. वाहतुकीसाठी स्वतंत्र नियोजन करून आवश्यक ठिकाणी बॅरिकेट्स बसविण्यात आले आहेत. श्री गणेशोत्सवासाठी तैनात पोलिसांना काल मंगळवारी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या नेतृत्वाखाली शहरांमधील भौगोलिक रचना, वातावरण व बंदोबस्ताची माहिती देण्यात आली.



