बेळगाव लाईव्ह : २७ तारखेपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी बेळगावातील बाजारपेठांमध्ये खरेदीचा प्रचंड उत्साह दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे बाजाराची गती मंदावली होती, मात्र पावसाचा जोर ओसरताच आणि विशेषतः शुक्रवारपासून ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे. बेळगावसह, चंदगड, गोवा आणि आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिक तसेच छोटे व्यावसायिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी शहरात दाखल झाले आहेत, ज्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या धुव्वाधार पावसामुळे बाजारात शुकशुकाट होता. मात्र पावसाने उघडीप दिल्यानंतर, विशेषतः शुक्रवारनंतर बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी वाढली. रविवारची साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे सकाळपासूनच नागरिकांची तुफान गर्दी दिसून आली, ग्राहकांच्या खरेदीचा उत्साह मात्र रात्री उशिरापर्यंत कायम होता. कपड्यांची दुकाने, सजावटीचे साहित्य, पूजा साहित्य, फुले, फळे, दागिने, तसेच गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर होणाऱ्या वाहन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी शोरूम्समध्येही मोठी गर्दी उसळली आहे. हि गर्दी ‘कॅश’ करण्यासाठी अनेक व्यावसायिक आस्थापने रात्री १० नंतरही सुरू असल्याचे निदर्शनास आले.
बेळगाव शहरातील प्रमुख बाजारपेठा असलेल्या मारुती गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार, पांगुळ गल्ली आणि मेणसे गल्ली या भागांमध्ये ग्राहकांच्या गर्दीने रस्ते फुलून गेले आहेत. याचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. दरवर्षी गणेशोत्सव आणि दिवाळीच्या काळात अशी परिस्थिती निर्माण होते, तरीही या गर्दी आणि वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक विभागाकडून विशेष नियोजनाची कमतरता जाणवत आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास हलक्या पावसाच्या सरी कोसळूनही नागरिकांनी खरेदीचा उत्साह कायम ठेवला.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी मूर्तींच्या सजावटीचा नवा ट्रेंड दिसून येत आहे. कुंदन, फेटा, मोती, आणि लेस अशा विविध प्रकारच्या सजावटीच्या साहित्याला मोठी मागणी आहे. विशेषतः पांगुळ गल्लीमध्ये आकर्षक आणि नवनवीन प्रकारचे सजावटीचे साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल झाले असून खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. यासोबतच, अलीकडे अनेक कुटुंबे घरगुती बाप्पांच्या स्वागतासाठी खास ‘ड्रेसकोड’ ठरवत आहेत. त्यामुळे, कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी एकसारखे आणि एकाच रंगाचे पारंपरिक कपडे खरेदी करण्याकडे तरुण वर्गाचा कल वाढला आहे. यामुळे कापडाच्या दुकानांमध्येही गर्दी वाढली आहे. एकंदरीत, गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने गणेशोत्सवाचा उत्साह अधिक वाढला असून, बेळगावातील बाजारपेठा पूर्णपणे गजबजलेल्या आहेत.


