बेळगाव लाईव्ह विशेष : लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी जनजागृतीचे माध्यम म्हणून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. एकत्र येऊन, देशासाठी विचार करण्यासाठी हा उत्सव सुरू झाला. पण आता या उत्सवाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. ११ दिवसांचा असलेला हा सण आता महिनाभर आधीच सुरू होतो, असे चित्र दिसते.
देवाच्या नावाखाली समाजात अंधश्रद्धा पसरवण्यापासून ते दिखाऊपणाला प्राधान्य देण्यापर्यंतचे प्रकार वाढले आहेत. गणेशोत्सवाच्या नावाखाली चाललेल्या या अवास्तव प्रकारांमुळे युवा पिढी शिक्षणापासून आणि व्यवसायांपासून दूर जात आहे, हे कुठेतरी थांबायला हवे, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.
धार्मिकतेला नक्कीच महत्त्व दिले पाहिजे, पण बाप्पाच्या नावाखाली चाललेल्या या दिखाऊपणामुळे युवा पिढीला बेरोजगारीचा सामना करावा लागेल. त्यांच्या हातातील व्यवसाय निसटून जातील आणि आपला समाज दारिद्र्यरेषेखाली जाईल, ही भीती व्यक्त होत आहे. रस्त्याच्या मधोमध मंडप टाकून वाहतुकीला अडथळा करणे, फटाक्यांमुळे प्रदूषण वाढवणे आणि मोठ्या मूर्तींची स्थापना करून विसर्जनावेळी अडचणी निर्माण करणे, हे सर्व कशासाठी? लोकमान्य टिळकांना अशा प्रकारचा गणेशोत्सव अपेक्षित होता का? गणेशमूर्ती आणण्यात कोणतीही स्पर्धा नसावी. गणेशोत्सव भव्य पद्धतीने साजरा करण्याचे आपले सामर्थ्य आहे, पण यावर गांभीर्याने विचार करण्याची ही योग्य वेळ आहे.
बेळगावच्या ऐतिहासिक गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीनंतर डॉल्बी, खराब रस्ते आणि विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाबाबत सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पूर्वी बेळगावात मंडळांची संख्या कमी होती आणि मूर्तीही लहान असायच्या, त्यामुळे जुन्या मार्गावर अडथळे येत नव्हते. पण आता मंडळांची संख्या वाढल्यामुळे मिरवणुकीच्या मार्गात बदल करण्याची मागणी जोर धरत आहे.
यावर प्रसाद हिशोबकर यांनी एक नवा मार्ग सुचवला आहे. पोस्टमन सर्कल, अंबा भुवन, रेल्वे स्टेशन रोड, रेल्वे ओव्हर ब्रिज, गोवावेस सर्कल, महात्मा फुले रोड, छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमार्गे कपिलेश्वर तलावापर्यंतचा हा मार्ग अधिक सोयीचा होईल. कारण हा रस्ता दुपदरी असून वीज वाहिन्यांचा अडथळा नाही. मिरवणुकीसाठी एक रस्ता वापरता येईल आणि दुसरा रस्ता भाविकांसाठी मोकळा राहील, त्यामुळे वाहतुकीचा अडथळा होणार नाही. तसेच, महात्मा फुले रोडवर गणेशभक्तांसाठी प्रेक्षक गॅलरीची सोयही करता येईल. प्रिया हलगेकर यांनीही या नव्या मार्गाला पाठिंबा दिला आहे.
याउलट, मयूर चौगुले यांनी मिरवणुकीच्या जुन्या मार्गात कोणताही बदल नको असे म्हटले आहे. ‘जुना मार्गच योग्य असून यंदा जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी केलेले नियोजन चांगले आहे’, असे त्यांनी सांगितले. वर्षा कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना ‘तुम्ही दोघे छोटे मोदीजी आहात’ असे संबोधून मिरवणुकीतील समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत. लक्ष्मीकांत पै यांनी ‘राजकीय नेत्यांनी डॉल्बीला पाठिंबा दिला नाही, तर मिरवणूक रात्री १२ वाजेपर्यंत संपेल’ असे म्हटले आहे, तर प्रदीप पवार यांनी डॉल्बी बंद करण्याची मागणी केली आहे. राहुल माने यांनी मात्र प्रथम खराब रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. ‘सरकारच्या अधिवेशनासाठी रात्र-दिवस रस्त्यांची दुरुस्ती केली जाते, तशीच आताही दुरुस्ती व्हावी. केवळ वरवरची मलमपट्टी करून तोंडाला पाने पुसू नयेत’, असे त्यांनी म्हटले आहे.
एकंदरीत, यावर्षीच्या गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीच्या निमित्ताने धार्मिकतेच्या नावाखाली चाललेल्या दिखाऊगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन आणि मंडळांकडून काय तोडगा काढला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




