बेळगाव लाईव्ह :दरवर्षीप्रमाणे श्री गणेश चतुर्थी निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बंगल्यात श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मुस्लिम असून देखील खुद्द जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्वतःच्या हाताने बाप्पाला आणून त्याची प्रतिष्ठापना करण्याद्वारे सामाजिक, जातीय सलोख्याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
दरवर्षीप्रमाणे आज श्री गणेश चतुर्थी दिवशी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय आणि त्यांच्या निवासस्थानी श्री गणेश मूर्तीची आणण्याचा कार्यक्रम सवाद्य पार पडला. यासाठी स्वतः जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन सहकुटुंब सकाळी राणी कित्तूर चन्नम्मा चौकातील श्री गणेश मंदिराच्या ठिकाणी दाखल झाले. त्या ठिकाणी प्रथम जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या चिरंजीवासमवेत मंदिरातील श्री गणेश मूर्तीचे पूजन करून आशीर्वाद घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात यंदाही पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना करण्यात आली आहे.
त्यानंतर परंपरेनुसार पूजा करून गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषणात गणरायाची मूर्ती घेऊन जिल्हाधिकारी रोशन मिरवणुकीने काही अंतर चालत गेले. त्यानंतर आपल्या शासकीय वाहनाने हातातील श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले.

तत्पूर्वी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना समस्त शहरवासीयांसह जिल्ह्यातील नागरिकांना श्री गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच हा सण शांततेने, बंधुभाव दाखवून सौहार्दपूर्णरित्या साजरा करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत शासकीय अधिकारी व त्यांचे हितचिंतक उपस्थित होते.

मोहम्मद रोशन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आणि शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करत पूजन मध्ये सक्रियरित्या सहभाग घेतला. यावेळी त्यांचे कुटुंबीय अन्य अधिकारी वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.


