बेळगाव लाईव्ह :सालाबाद प्रमाणे बेळगाव शहरातील श्री गणेशोत्सव अपूर्व उत्साहात सुरळीत शांततेने पार पडावा यासाठी शहराचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी उत्सव काळात सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळे आणि गणेश भक्तांनी कोणती खबरदारी घ्यावी, कोणत्या सूचना पाळाव्यात याबाबत एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे मार्गदर्शक सूची जाहीर केली आहे.
श्री गणेश उत्सवासाठी पोलिसांची मार्गदर्शक सूची पुढील प्रमाणे आहे. बेळगाव शहरातील बाप्पाचे आगमन सोहळे दि. 23 ते दि. 27 ऑगस्ट या दरम्यान आयोजित करावेत. आगमन सोहळे करू इच्छिणाऱ्या श्री गणेश मंडळांनी त्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे. डॉल्बी-डीजे वर पूर्णपणे बंदी आहे. मार्ग आणि वेळापत्रक स्थानिक पोलीस स्थानकाशी सल्लामसलत करूनच अंतिम करावा आणि वाहतुकीस अडथळा येणार नाही याची खबरदारी घ्यावी.
श्री गणेशोत्सव काळामध्ये पार्किंगसाठी जागा निश्चित करण्यात आल्या असून लवकरच याची माहिती जाहीर केली जाणार आहे. पार्किंगची जागा जिल्ह्यातील व इतर राज्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे. उत्सव काळात सोशल मीडिया किंवा फलकांवर कोणतीही भडकाऊ पोस्ट टाकल्यास गुन्हा नोंद केला जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
याशिवाय गणेश भक्तांच्या सोयीसाठी अन्न आणि पाणी विक्रेत्यांना रात्रीच्या वेळी दुकाने -हॉटेल सुरू करण्यासाठी अतिरिक्त परवानगी देण्यात येणार आहे. रात्री 10 वाजल्यानंतर मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. जर कोणाला यामुळे त्रास होत असल्यास 112 क्रमांक वर संपर्क साधण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे.
श्री गणेशोत्सवाच्या 11 दिवसांच्या काळात रुग्णवाहिका व अग्निशामक वाहनांना कोणताही अडथळा होणार नाही याची देखील खबरदारी घेतली जावी. मंडप उभारताना गणेश मंडळांनी रस्त्यावर रहदारीसाठी जागा मोकळी ठेवावी. मिरवणूक मार्गासंदर्भात सूचना : रात्री 12:00 वाजता चन्नम्मा सर्कलपासून काकतीवेसकडे जाणारा रस्ता बंद केला जाईल.
श्री गणेश मंडळांना कॉलेज रस्त्याकडे वळवले जाईल. तसेच रात्री 02:00 वाजता पोतदार क्रॉस बंद केला जाईल आणि मंडळांना खडेबाजार रस्त्याकडे वळवले जाईल. त्यानंतर पहाटे 04:00 वाजता हुतात्मा चौकापासून रामदेव गल्लीचा प्रवेश बंद केला जाईल. मिरवणुका किर्लोस्कर रस्त्यामार्गे मुख्य मिरवणुकीत सामील केल्या जातील. श्रीमूर्ती वाहतूक नियम : डिझेल जनरेटर सेट आणि साऊंड सिस्टम पुढील ठिकाणी मूर्ती वाहून नेणाऱ्या ट्रॉलीपासून वेगळे करावेत – 1) हेमू कलानी चौक (कपिलेश्वर होंड), 2) शनि मंदिर (कपिलेश्वर होंड), 3) बँक ऑफ इंडिया (कपिलेश्वर होंड), 4) शिवाजी गार्डन (कपिलेश्वर होंड), 5) मराठा मंदिर क्रॉस (जक्कीन होंड). स्वयंसेवकांची नेमणूक : मिरवणुकीदरम्यान पोलिसांना सहकार्य करण्यासाठी प्रत्येक सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने आपल्या 5 स्वयंसेवकांची नावे द्यावीत.
रात्रीच्या बसेसची व्यवस्था : उत्सव पाहण्यासाठी शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी रात्रीच्या वेळी बस व्यवस्था करण्यासाठी केएसआरटीसीला विनंती करण्यात आली आहे. तपासणी आणि कायदेशीर कारवाई : उत्सव काळात दारू, मादक पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तपासणी पोलिसांकडून केली जाईल. जर कोणी दारू किंवा मादक पदार्थांच्या प्रभावाखाली आढळले, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
बॅनर आणि ध्वज नियम : बॅनर आणि ध्वज फक्त खासगी मालमत्तेवर लावावेत. सार्वजनिक मालमत्तेवर लावल्यास ते काढून टाकले जातील. मिरवणुकीत सहकार्य : मिरवणुकीदरम्यान कोणतेही मंडळ पुढे जाऊ इच्छित असल्यास, पुढील मंडळाने त्यांना जागा द्यावी, असे आवाहन पोलिस भूषण बोरसे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.


