बेळगाव लाईव्ह : छत्तीसगडमध्ये अलीकडेच वादग्रस्त परिस्थितीत अटक करण्यात आलेल्या केरळमधील दोन कॅथोलिक नन आणि एका आदिवासी युवकाच्या तात्काळ सुटकेची मागणी करत शुक्रवारी सायंकाळी बेळगावमध्ये ख्रिस्ती समुदायाकडून मूक निषेध मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा कॅथोलिक असोसिएशन ऑफ बेळगाव आणि इतर ख्रिस्ती संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. बिशप रेव्ह. डॉ. डेरेक फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ४०० ख्रिस्ती नागरिक, यामध्ये धर्मगुरू, नन्स, सेमिनरीतील विद्यार्थी, पुरुष व महिला सहभागी झाले होते. संध्याकाळी ४.४० वाजता डीसी कॉम्पाउंडवर जमलेला मोर्चा जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयापर्यंत गेला आणि तेथे भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री यांना उद्देशून एक निवेदन उपविभागीय आयुक्त मोहम्मद रोशन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
२५ जुलै रोजी दुर्ग रेल्वे स्थानकावर नन आणि एका युवकाला झालेली चुकीची अटक आणि त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (कलम १४३) व छत्तीसगड धार्मिक स्वातंत्र्य कायदा (कलम ४) अंतर्गत लावलेल्या धार्मिक धर्मांतराच्या खोट्या आरोपांचा निषेध करण्यात आला. हे तिघेही नारायणपूर येथून तीन आदिवासी महिलांना (वय १८-१९) त्यांच्या पालकांच्या संमतीपत्रासह आग्रा येथे नर्सिंगच्या नोकरीसाठी घेऊन जात होते. एका उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्याच्या दबावामुळे राजकीय आणि सांप्रदायिक द्वेषातून प्रेरित होऊन खोटे आरोप लावण्यात आले. मात्र, नंतरच्या चौकशीत आणि कुटुंबियांच्या निवेदनांनुसार, महिला स्वेच्छेने प्रवास करत होत्या हे स्पष्ट झाले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या वेळी बोलताना बिशप डेरेक फर्नांडिस यांनी या अटकेचा तीव्र निषेध करत हे “अन्यायकारक व निरर्थक” असल्याचे सांगितले. “कॅथोलिक धर्मीय जबरदस्ती धर्मांतर करत नाहीत,” असे ते म्हणाले. ननवर झालेल्या शारीरिक अत्याचाराचा निषेध करत त्यांनी वाढत्या सांप्रदायिक हिंसाचाराविरुद्ध सावधगिरीचा इशारा दिला. निर्दोषांची तात्काळ मुक्तता आणि खोट्या आरोपांवर आधारित छळ थांबवावा. सरकारने अल्पसंख्यांकांचे हक्क सुरक्षित ठेवावेत आणि भारतातील धर्मनिरपेक्ष मूल्यांची राखण करावी, अशी मागणी त्यांनी केली.
उपविभागीय आयुक्त मोहम्मद रोशन यांनी निवेदन स्वीकारत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी रेव्ह. फादर फिलिप कुट्टी, रेव्ह. नुरुद्दीन मुळे, क्लारा फर्नांडिस, लुईस रॉड्रिग्स, फादर प्रमोद कुमार, सिस्टर पास्टर अंकलगी, सिस्टर लोर्ड जोसेफ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


