बेळगाव लाईव्ह – आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने काल श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरात बलराम जयंती साजरी करण्यात आली.
सकाळी मंगल आरती, शृंगार दर्शन ,गुरु पूजा आणि श्रीमद् भागवतावर प्रवचन झाले.
सायंकाळी श्रीकृष्ण बलराम विग्रहांवर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर इस्कॉन चे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांचे बलराम जन्मावर प्रवचन झाले.
“श्रीकृष्ण आणि बलराम यांच्यामध्ये काहीही अंतर नाही, फक्त श्रीकृष्ण हे सावळे आहेत तर बलराम हे गोरे आहेत. श्रीकृष्ण बलराम रूपात स्वतःला विस्तारित करतात.
बलराम श्रीकृष्णांचे मोठे भाऊ आहेत”. असे सांगून ते म्हणाले की, बलरामजी यांची माता रोहिणी असून श्रीकृष्णाची माता यशोदा आहे असे असताना ते भाऊ कसे? याबाबतचे स्पष्टीकरण करताना भक्तिरसामृत स्वामी महाराज यांनी सांगितले की, “देवकी मातेच्या गर्भात बलराम हे सातवे पुत्र होते पण त्यांचा कंसाकडून वध होऊ नये म्हणून योगमायाला बोलावून श्रीकृष्णानी त्यांना माता रोहिणीच्या गर्भात स्थानांतर केले.
आणि अशाप्रकारे गोकुळात श्रावण महिन्यातल्या पौर्णिमेदिवशी दुपारी बलराम यांचा जन्म झाला. देवकी मातेचा गर्भपात झाला असे समजून कंस शांत बसला आणि त्यानंतर श्रीकृष्णांचा जन्म झाला.
भगवंतांना प्राप्त करण्यासाठी हृदयाचे शुद्धीकरण असण्याची गरज असल्याचे प्रतिपादनही भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी केले. बलराम यांच्या जीवनातील अनेक गोष्टीवर त्यांनी प्रकाश टाकला.
त्यानंतर आरती व सर्वांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात आले.


