बेळगाव लाईव्ह :आम्ही पर्यावरण पूरक शाडूच्या घरगुती श्री गणेश मूर्ती बनवतो. पूजेसाठी शाडू मातीच्या श्रीमूर्ती योग्य असतात, शिवाय पीओपीच्या तुलनेत शाडूमुळे मूर्तीला सजीवपणा येतो असे सांगून जास्त सजावटीमुळे मूर्तिकाराची मूर्तीकला झाकली जाते, असे मत अनगोळ येथील मूर्तिकार आप्पाजी सुतार यांनी व्यक्त केले.
श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव लाईव्हच्या प्रतिनिधीने मूर्तिकार सुतार यांची भेट घेऊन संवाद साधला असता ते बोलत होते. शिवशक्तीनगर, अनगोळ येथील रहिवासी असलेले मूर्तिकार आप्पाजी दत्तात्रय सुतार यांचा शाडूच्या पर्यावरण पूरक घरगुती श्री गणेश मूर्ती बनवण्यात हातखंडा आहे. श्रीमूर्ती बनवण्याचा त्यांचा व्यवसाय हा वडिलोपार्जित आजोबा, पणजोबांच्या काळापासून सुरू आहे. बेळगाव लाईव्हशी बोलताना आप्पाजी सुतार यांनी सांगितले की, लहानपणापासून हस्तकलेची आवड असल्यामुळे मी इयत्ता पहिलीपासून मूर्ती कलेचा श्री गणेशा केला. मी इयत्ता चौथीमध्ये असताना आम्ही जवळपास 50 ते 60 घरगुती श्रीमुर्ती बनवत होतो.
तेंव्हापासून मला मूर्ती कलेची जास्त आवड निर्माण झाली आणि कालांतराने आमच्याकडील मूर्तींची संख्या देखील वाढत गेली. तथापि इतर व्यापामुळे मूर्ती कलेसाठी जास्त वेळ देऊ शकत नसल्यामुळे आम्ही आमच्याकडील घरगुती मूर्तींची संख्या 60 ते 65 इतकी मर्यादित ठेवली आहे. आमच्याकडील घरगुती श्री गणेश मूर्ती हाताने बनवलेल्या असतात. फोटो पाहून आम्ही मूर्ती बनवून देऊ शकतो, ज्या मूर्ती दीड ते पावणेदोन फुटाच्या असतात. मूर्ती बनवण्याच्या कामांमध्ये मला माझी पत्नी, मुलगा, माझे भाचे आणि मित्रांची मुले सहकार्य करतात.
मूर्ती सजावटीच्या बाबतीत बोलताना आप्पाजी सुतार म्हणाली की, गणेश भक्त खूप सजावटीची मागणी करतात. तशी पूर्वी देखील मागणी असायची मात्र त्या वेळी मूर्तीला सजावट कमी असायची. आता जास्त सजावटीची मागणी केली जात असल्यामुळे मूर्तिकाराची मूर्तिकला झाकली जाऊन ती उठून दिसत नाही. मूर्तिकला दिसायची असेल तर सजावट थोडी कमी करावयास हवी असे सांगून दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाडू मातीची मूर्तीच पूजेला योग्य आणि पर्यावरण पूरक असते.
ही मूर्ती जास्तीत जास्त दीड फुटापर्यंत किंवा त्यापेक्षा कमी उंचीची असावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपण श्री गणेश चतुर्थीपूर्वी तीन महिने आधी मूर्ती बनवण्यास सुरुवात करतो. तसेच दरवर्षी महागाईमुळे शाडू मातीसह वाहतूक वगैरेचा खर्च वाढत असल्यामुळे त्यानुसार मूर्तीची किंमतही वाढवावी लागते.
आज-काल पीओपी अर्थात प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनत असल्या तरी शाडूच्या मूर्तीमध्ये जो एक प्रकारचा जिवंतपणा असतो तो त्यामध्ये दिसून येत नाही अशी माहिती देऊन मूर्तीच्या रंगरंगोटीसाठी आपण नैसर्गिक जल रंगांचा (वॉटर कलर) वापर करतो असे मूर्तिकार आप्पाजी सुतार यांनी शेवटी स्पष्ट केले


