बेळगाव लाईव्ह:भारतीय लष्करात सेवेत असलेल्या बेलगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील ऐगळी गावचा रहिवासी अग्निवीर जवान किरणराज केदारी तेलसंग (वय २३) यांचे मंगळवारी सकाळी पंजाब राज्यात कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून लष्करात भरती झालेल्या किरणराज यांनी अवघ्या एका वर्षातच आपले आयुष्य गमावले आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर आणि संपूर्ण गावकऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
किरणराज यांनी एक वर्षापूर्वी भारतीय लष्करात प्रवेश घेतला होता. प्रशिक्षण पूर्ण करून सुमारे सहा महिन्यांपूर्वी सुट्टीवर गावात आले होते आणि त्यानंतर पुन्हा पंजाब राज्यातील पाटियाळा रेजिमेंटमध्ये कर्तव्यावर रुजू झाले होते. मंगळवारी सकाळी रोजच्या प्रमाणे सहकाऱ्यांसोबत धावण्याच्या सरावात भाग घेत असताना मैदानातच कोसळले आणि त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला, असे लष्करी सूत्रांनी सांगितले.
या अपघाती मृत्यूने संपूर्ण ऐगळी गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात वडील, आई, बहीण, भाऊ आणि मोठा आप्तपरिवार आहे.
गुरुवारी अंत्यदर्शन व अंत्यसंस्कार:
मृत जवानाचे पार्थिव पंजाबहून बुधवार सायंकाळी दिल्ली विमानतळावरून बेलगाव विमानतळावर गुरुवारी सकाळी पोहोचणार आहे. त्यानंतर भारतीय लष्कराच्या शासकीय वाहनातून ऐगळी गावात नेण्यात येणार असून, तेथे अंतिम दर्शन व संपूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
देशासाठी सेवा करताना प्राण गमावलेल्या या वीर जवानास अखेरचा निरोप देण्यासाठी ग्रामस्थांनी तयारी सुरू केली आहे.


