बेळगाव: येळ्ळूर गावातील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ नामफलकाच्या प्रकरणानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे लागू करण्यात आलेल्या जमावबंदी आदेशाचे (कलम १४४) उल्लंघन करत शिवसेनेने सभा घेतल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी आज ( 30 जुलै 2025) बेळगाव येथील चौथ्या जेएमएफसी न्यायालयात तपास अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवण्यात आली. उद्यमबाग पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, येळ्ळूर गावात अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ नामफलकाच्या वादामुळे बेळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या सभा किंवा समारंभांवर बंदी घातली होती. असे असतानाही, १ ऑगस्ट २०१४ रोजी शिवसेनेने एका सभेचे आयोजन केले.
या सभेत प्रक्षोभक भाषणे करून जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी हर्षद मोहनराव कदम, गणपती मारुती साळुंके, दादासो अनंत पानस्कर, प्रमोद हनुमंत चव्हाण आणि अभिजीत रामचंद्र पाटील यांच्या विरोधात कलम १४३, १८८ सह १४९ आयपीसी आणि ३५ केपी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेळगाव येथील चौथ्या जेएमएफसी न्यायालयात तपास अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी वकील शामसुंदर पत्तार, हेमराज बेनचनावर, शिवसेनेचे प्रकाश शिरोळकर वकील वर्ग आणि वकील मारुती कामाणाचे उपस्थित होते.




