बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्य काँग्रेस सरकारने लागू केलेल्या ‘शक्ती योजने’ला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज बेळगावमध्ये ‘नारी शक्ती आनंदोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ५०० कोटी महिलांनी सार्वजनिक बसमधून मोफत प्रवास केल्याचा दावा सरकारने केला आहे, ज्याला ‘महिला सक्षमीकरणाचा जागतिक विक्रम’ असे संबोधले जात आहे.
या सोहळ्यात बोलताना आमदार आसिफ सेठ यांनी ‘शक्ती योजने’च्या यशावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, या योजनेमुळे केवळ महिलांनाच मोठा फायदा झाला नाही, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही बळ मिळाले आहे. “या योजनेमुळे राज्यातील महिलांना तब्बल १२,६६९ कोटी रुपयांची बचत झाली आहे,” असे सेठ यांनी नमूद केले. सरकारने आपल्या ‘पंच गॅरंटी’ योजना यशस्वीपणे राबवल्या असून, त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. भविष्यातही या गॅरंटी योजना सुरूच राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बेळगाव जिल्हा अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष विनय नावलगट्टी यांनीही ‘शक्ती योजना’ महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याचे सांगितले. “निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले वचन पूर्ण करत सरकारने ही योजना सुरू केली, ज्यामुळे परिवहन मंडळालाही मोठा फायदा झाला आहे,” असे नावलगट्टी म्हणाले. बेळगाव जिल्ह्यात ही योजना विशेषतः यशस्वी ठरल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला के.एस.आर.टी.सी. जिल्हा नियंत्रण अधिकारी राजेश हुद्दार, प्रदीप एम.जे., मलगौडा पाटील, बी.डी. गुरिकार, साधिक इनामदार, आयेशा सनदी यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. ‘शक्ती योजने’च्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाला चालना मिळाल्याचे या प्रसंगी उपस्थितांनी सांगितले.


