बेळगाव लाईव्ह : सालाबाद प्रमाणे वडगाव येथील जागृत देवस्थान श्री मंगाई देवीच्या यात्रेला उद्या मंगळवार दि. 22 जुलै 2025 रोजी प्रारंभ होत असून त्या अनुषंगाने जय्यत तयारी करण्यात आली आहे. यात्रा सर्वांची असल्यामुळे समस्त भक्तजन, स्टॉल धारक, व्यापारी वगैरे सर्वांनी यात्रा यशस्वी करण्यास करावे, असे आवाहन चव्हाण -पाटील यांनी केले आहे.
वडगाव येथील श्री मंगाई देवस्थानाच्या ठिकाणी आज सोमवारी सकाळी ते बेळगाव लाईव्हशी बोलत होते चव्हाण -पाटील म्हणाले की, वडगावची श्री मंगाई देवीची यात्रा उद्या 22 जुलै 2025 रोजी होऊ घातली असून त्या अनुषंगाने जय्यत तयारी करण्यात आली आहे. उद्या यात्रेच्या पहिल्या दिवशी देवी मिरवणुकीने गावात फेरी मारणार आहे.
यावेळी परंपरेनुसार पाच मंदिरांमध्ये कापूर प्रज्वलित करून सकाळी 11 वाजण्यापूर्वी गाऱ्हाणे उतरवले जाईल. गाऱ्हाणे उतरवण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर श्री मंगाई देवीचे मंदिर जनतेसाठी देवदर्शनाकरिता खुले केले जाईल. सदर यात्रा उत्साहात शांततेने सुरळीत पार पाडण्यासाठी आम्हाला समस्त जनतेचे सहकार्य हवे आहे.

दरवर्षी या यात्रेला स्टॉल धारकांसह 70 ते 80 हजार भाविक येत असतात. इतक्या मोठ्या संख्येने जनसमुदाय एकत्र येत असल्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे सर्वांनी आवश्यक ती काळजी खबरदारी घेणे गरजेचे आहे. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. दरवेळी पोलीस आपले काम चांगल्या प्रकारे पार पाडत असले तरी जनतेने सहकार्य खूप महत्त्वाचे असते.
वडगाव येथील श्री मंगाई देवीची यात्रा ही गोरगरीब सर्वसामान्यांची यात्रा म्हणून सुपरिचित आहे. या ठिकाणी येणारे स्टॉल धारक वर्षभराचे उत्पन्न मिळवून जातात. यात्रेला येणाऱ्या सर्वांची मनोकामना देवी पूर्ण करो अशी मी प्रार्थना करतो. यात्रे संदर्भात पोलीस प्रशासनाशी चर्चा झाली असून पोलिसांना आवश्यक माहिती पुरवण्यात आली आहे. रहदारीची कोंडी न होता यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी विष्णू गल्लीच्या तालमी जवळ कोपऱ्यावर, येळ्ळूर रोड रोड वगैरे ठिकाणी बॅरिकेड्स घालण्यात आले आहेत.
वाहन चालकांना देखील विनंती आहे की त्यांनी आपल्या दुचाकी आणि चारचाकी श्री मंगाई देवी मंदिरापर्यंत आणण्याचा प्रयत्न करू नये. आपली वाहने बाहेरच लावून पायी देवीच्या दर्शनासाठी जावे. श्री मंगाई देवी यात्रा सात -आठ दिवस चालते. ही यात्रा सर्व थरातील भक्तजन, स्टॉल धारक, व्यापारी वगैरे सर्वांची असल्यामुळे सर्वांनी यात्रा यशस्वी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन चव्हाण -पाटील यांनी आपले समस्त भाऊबंद यात्रा कमिटी आणि वडगाव यांच्यावतीने केले.




