बेळगाव लाईव्ह : बेळगाव पोलीस आयुक्तालयाने २०२३ पासून आतापर्यंत अंमली पदार्थ तसेच मटका व अन्य जुगाराच्या विरोधात केलेल्या कारवाईची आकडेवारी जाहीर केली आहे.
या दोन वर्षांच्या कालावधीत तब्बल २२ लाख ६३ हजार ४३३ रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, जुगार खेळणाऱ्या ९९३ जणांना अटक करून त्यांच्याकडील २८ लाख २१ हजार २२४ रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
बेळगाव पोलिसांनी अंमली पदार्थ प्रकरणी केलेल्या कारवाईत सातत्य राखले आहे. २०२३ मध्ये २३ गुन्हे दाखल करत ३४ आरोपींना अटक करण्यात आली होती, त्यावेळी १२ किलो ६७९ ग्रॅम अंमली पदार्थ जप्त केले होते, ज्याची किंमत ५ लाख ७१ हजार २४३ रुपये होती.
त्यानंतर, २०२४ मध्ये २५ गुन्हे दाखल होऊन ३९ आरोपींना गजाआड करण्यात आले. या वर्षी ११ किलो ७८८ ग्रॅम ८४४ मिलिग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले, ज्याची किंमत १० लाख ६८ हजार ९५० रुपये होती. विशेष म्हणजे, २०२४ मध्ये अंमली पदार्थ सेवनाची ३० प्रकरणे समोर आली, ज्यात ४० आरोपींचा समावेश होता. चालू वर्षात, म्हणजेच १३ जुलै २०२५ पर्यंत, २० गुन्हे दाखल झाले असून ४२ आरोपींना पकडण्यात आले आहे. यावेळी १७ किलो २३२ ग्रॅम ५५२ मिलिग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले, ज्याची किंमत ६ लाख २३ हजार २४० रुपये आहे. या वर्षात अंमली पदार्थ सेवनाची २१ प्रकरणे नोंदवली गेली असून त्यात २३ आरोपी आहेत.
अंमली पदार्थांसोबतच, बेळगाव पोलिसांनी जुगार आणि मटक्याच्या विरोधातही कठोर मोहीम राबवली आहे. २०२३ मध्ये जुगाराचे १२३ गुन्हे दाखल झाले, ज्यात ४११ आरोपींना अटक करून ९ लाख १५ हजार २०९ रुपये जप्त करण्यात आले. २०२४ मध्ये १२४ गुन्हे दाखल झाले, ज्यात ३२६ आरोपींना पकडण्यात आले आणि १२ लाख ५६ हजार १२४ रुपये जप्त करण्यात आले.
तर, चालू वर्षात (१३ जुलै २०२५ पर्यंत) ९५ गुन्हे दाखल झाले असून २५६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ६ लाख ४९ हजार ८९१ रुपये जप्त करण्यात आले आहेत. एकूण, या कालावधीत जुगार आणि मटक्याचे ३४२ गुन्हे नोंदवले गेले असून, ९९३ आरोपींना पकडून त्यांच्याकडून २८ लाख २१ हजार २२४ रुपयांची एकूण रोकड जप्त करण्यात आली आहे.


