बेळगाव लाईव्ह : चोर्ला भागातून असो किंवा अनमोड भागातून असो गोव्याला जाणारा रस्ता म्हणजे सध्या एक मोठी समस्या आहे. सध्याच्या पावसाळ्यात दोन्ही मार्गांची अवस्था दयनीय होत असताना आज मंगळवारी सकाळी जांबोटीच्या दिशेने जाणारा एक अवजड वाहतूक करणारा ट्रक रस्त्याशेजारी जमिनीत रुतल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. परिणामी या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तासंतास वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागून वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
खानापूर तालुक्यातील जांबोटी मार्गे गोव्याला जाणारा प्रवास म्हणजे एक मोठी समस्याच आहे. चोर्ला भागातून असो किंवा अनमोड भागातून असो गोव्याला जाणारा रस्ता म्हणजे “आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास” अशी परिस्थिती आहे. एकंदरीत गोव्याला जोडणाऱ्या या दोन्ही रस्त्याची परिस्थिती दयनीय होत आहे.
एकीकडे अनमोड मार्गावरील महामार्ग खचल्याने अवजड वाहनांची मोठी गोची झाली असताना त्यात भर म्हणून कुसमळी नजीकचा पुल नवा असल्याने सध्या या पुलावर अवजड वाहनांना बंदी आहे. परिणामी पर्यायी मार्ग म्हणून अवजड वाहन चालक खानापूरहून जांबोटी मार्गाचा अवलंब करत आहेत.
तथापी हा रस्ता तितका असा रुंद नसल्यामुळे अवजड वाहनांना दुसऱ्या वाहनाला रस्ता देताना कसरत करावी लागत आहे. याच प्रयत्नात मंगळवारी सकाळी जांबोटीच्या दिशेने जाणारा एक अवजड वाहतूक करणारा ट्रक दुसऱ्या एका ट्रकला रस्ता देताना रस्त्याच्या बाजूला पूर्णतः रुतून बसला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. बस वाहतूकीसह भाजीपाला वगैरे सर्व प्रकारची वाहतूक टप्प झाल्यामुळे सदर मार्गाच्या दोन्ही बाजूला आज सकाळी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. चक्काजाम झाल्यामुळे सकाळी शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांना शाळेला जाणे कठीण झाल्यामुळे कांही विद्यार्थ्यांना दांडी द्यावी लागली तर कांहीना चालत जाऊन शाळा गाठावी लागली.
कुसमळी नजीकचा पूल बांधून पूर्ण झाला असलातरी पुलावरून अवजड वाहतूक आजही करणे अवघड आहे. त्यामुळे या मार्गावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे पर्यायी मार्गाचा अवलंब करून सक्तीने अनमोड मार्गे महामार्गाकडे वळविण्यात आली आहे. तथापी अनमोड महामार्गावर एका ठिकाणी रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आता तेथेही अवजड वाहतुकीला ब्रेक लावण्यात आला आहे.
ट्रक, कंटेनर वगैरे अनेक अवजड वाहनचालक सध्या खानापूरहून जांबोटी मार्गे चोर्ला मार्गाचा अवलंब करत असले तरी हा राज्यमार्ग सिंगल असल्याकारणाने दुहेरी वाहतूक या ठिकाणी धोक्याची बनली आहे. समोरून येणाऱ्या एखाद्या ट्रकला ओव्हरटेक करणे तर सोडाच वाट करून देणे इतपतही काही ठिकाणी जागा नसल्याने अवजड वाहने मातीत रुतून रस्ताच पूर्णतः बंद होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचाच प्रत्यय आज मंगळवारी सकाळी आला. त्यामुळे सकाळपासून या रस्त्यावर तासंतास वाहनांच्या रांगा लागून राहिल्या होत्या.




