बेळगाव लाईव्ह ; खानापूर तालुक्यातील गुंजी नजीक असलेल्या किरवळे येथील सुप्रसिद्ध गोरक्षनाथ मठात चोरी झाल्याची घटना बुधवारी घडकीस आली आहे.मठात कुणीही नसलेले पाहून चोरट्यांनी डल्ला मारला आहे .या घटनेने मठाच्या भाविकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या चोरी संदर्भात मठाचे मठाधिपती श्री पीर योगी मंगलनाथजी महाराज यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्री गोरक्षनाथ मठाचे मठाधिपती श्री पीर योगी मंगल नाथजी महाराज व त्यांचे शिष्य राहुल लक्ष्मण पाटील, बेळगाव, हे दोघेजण 26 जून रोजी एका देवस्थानला गेले होते.
त्यानंतर देवस्थानाहून बुधवारी 2 जुलै रोजी मठावर परत आले असताना, त्यांना मठाच्या स्वयंपाक खोलीचा दरवाजा तोडलेला तर आतील तिजोरीचा दरवाजा मोडून उघडा ठेवलेला दिसला तसेच साहित्याची मोठ्या प्रमाणात मोडतोड केल्याचे त्यांना दिसून आले त्यावेळी तपासणी केली असता तिजोरीतील 25 ते 30 हजार रुपयांच्या किंमती वस्तू व ऐवज चोरट्यांनी लांबविले असल्याचे त्यांना दिसून आले.
या नंतर त्यांनी तात्काळ खानापूर पोलीस स्थानकात याबाबतची तक्रार नोंदविली आहे. याबाबत खानापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.चोरीच्या या प्रकरणामुळे मठाच्या भाविकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी भाविकातून होत आहे.


