बेळगाव लाईव्ह :कमिशनच्या आशेने सायबर गुन्हेगारांना मदत करण्याकरिता बनावट कंपन्यांच्या नावे बँकेत खाते (करंट अकाउंट) उघडून सायबर फसवणुकीत सहभागी असणाऱ्या तिघा जणांना तामिळनाडू पोलिसांनी काल गुरुवारी बेळगावमध्ये अटक केली.
तामिळनाडू पोलीस खात्याच्या सूचनेवरून बेळगाव शहरांमध्ये दाखल झालेल्या चेन्नई पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे अनिल कोल्हापुरे (रा. कुवेंपूनगर बेळगाव), रोहन कांबळे (रा. गणेशपुर बेळगाव) आणि सर्वेश किवी (रा. आरपीडी क्रॉस, टिळकवाडी बेळगाव) अशी आहेत.
या तिघा आरोपींनी दोन बनावट कंपन्या उघडून त्या कंपन्यांच्या नावे बँकेत करंट अकाउंट सुरू केले होते. विशेष म्हणजे हे अकाउंट सायबर गुन्हेगारांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आले होते. या अकाउंटवर होणारे एकूण व्यवहारावर त्यांना कमिशन दिले जात होते. कमिशनच्या आशेला बळी पडून या तिघा तरुणांनी सायबर गुन्हेगारांना मदत केल्याचे उघड झाले आहे. या त्रिकुटाच्या नावावर 27 हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत.
उपरोक्त तिघांनी बंगलोर आणि तुमकुर तेथील लोकांची फसवणूक करून पोलिसांची दिशाभूल केली होती. तथापि काल गुरुवारी चेन्नई येथील पोलीस दलाच्या एसीपी प्रियदर्शनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेळगावात येऊन या त्रिकुटाला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांना बेळगाव तृतीय जेएमएफसी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आणि ट्रांझिट वॉरंट घेऊन तिघांनाही चेन्नईला नेण्यात आले आहे.
सायबर गुन्हेगारांविषयी नागरिकांनी सावधगिरी बळगावी सोशल मीडियावर येणाऱ्या अनावश्यक लिंक वर थेट क्लिक करू नये. गुन्हेगार कोणालाही फसवू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


