बेळगाव लाईव्ह :राज्यातील असंख्य युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळलेली असल्यामुळे विविध राज्य सरकारी खात्यांसाठी ताबडतोब अंतर्गत राखीवता जाहीर करण्याबरोबरच नव्या नियुक्त्यांची अधिसूचना जारी करावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा दलित विद्यार्थी परिषदेने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली असून तसे निवेदन आज मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.
बेळगाव जिल्हा दलित विद्यार्थी परिषदेतर्फे (डीव्हीपी) आज गुरुवारी सकाळी कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथे जोरदार आंदोलन छेडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील बहुसंख्य युवक -युवतींचा सहभाग असलेला आणि निदर्शने करत निघालेला हा मोर्चा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोर्चाची सांगता होऊन मुख्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ते त्वरित मुख्यमंत्र्यांकडे धाडण्याचे आश्वासन दिले.
राज्यातील महसूल खाते, ग्रामीण विकास खाते, कामगार खाते, समाज कल्याण खाते, इंधन खाते, अर्थ खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, परिवहन खाते, बागायत खाते, शिक्षण खाते वगैरे सरकारी खात्यांमध्ये अंतर्गत राखीवते अंतर्गत नियुक्त केल्या जातील असे सांगून वेळ मारून नेण्याच्या राज्य सरकारच्या कृतीचा आम्ही निषेध करतो. राज्यातील अनुसूचित जाती -जमाती, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक आणि सामान्य वर्गातील लाखो विद्यार्थी, बेरोजगार युवकांची वयं उलटून जात असल्यामुळे त्यांच्यात नैराश्य येऊ लागले आहे.
अंतर्गत राखीवता जाहीर करण्यास विलंब केला जात असल्यामुळे सरकारी खात्यातील नियुक्त्या रखडल्या आहेत. तरी राज्यातील असंख्य युवकांची बेरोजगारीची समस्या लक्षात घेऊन विविध राज्य सरकारी खात्यांसाठी ताबडतोब अंतर्गत राखीवता जाहीर करण्याबरोबरच नव्या नियुक्त्यांची अधिसूचना जारी करावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. मागणी मान्य न झाल्यास राज्यव्यापी उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदन सादर करतेवेळी दलित विद्यार्थी परिषदेचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष अथर्व गस्ती, उपाध्यक्ष संदीप एहोळे, विजयपूरचे अध्यक्ष अक्षयकुमार अजमनी, संघटनेचे राज्य संपर्क सचिव अजित मादर, राज्य संचालक बालाजी कांबळे आदिंसह बहुसंख्य युवक युवती उपस्थित होते.


