बेळगाव लाईव्ह :गेल्या दहा दिवसात शहरातील समर्थनगर येथे दुसरी हल्ल्याची घटना घडली असून यावेळी दुचाकी आडवी लावल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका युवकावर चाकू हल्ला करण्यात आला आहे.
चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नांव आदित्य सुळधाळ (वय 23) असे समजते. समर्थनगर येथे अलीकडेच एका ऑटोरिक्षा चालकाला लाठ्या-काठ्याने मारहाण करण्याची घटना ताजी असताना गेल्या मंगळवारी समर्थनगर दुसरा क्रॉस येथे चाकू हल्ल्याची घटना घडली आहे.
चाकू हल्ला करणारा आरोपी हा अल्पवयीन आहे. केवळ दुचाकी आडवी लावल्याच्या कारणावरून झालेल्या मारामारीचे पर्यवसान आरोपीने समोरील युवकाला चाकूचे वार करून गंभीर जखमी केले त्या जखमीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
या पद्धतीने अवघ्या दहा दिवसात प्राणघातक हल्ल्याच्या दोन घटना घडल्यामुळे शांतताप्रिय समर्थनगर येथील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. मंगळवारी झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस तपास सुरू आहे.



