रायबागमध्ये वकिलाच्याच कटातून वकिलाचा खून

0
25
Guled sp
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात वादग्रस्त मालमत्तेच्या ताब्यासाठी वकिलांच्याच गटाने एका वकिलाचे अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना अटक केली असून, अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रायबागमधील वकील संतोष पाटील यांचा त्याच क्षेत्रातील काही वकिलांनीच संपत्तीच्या वादातून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या गुन्ह्यात आठ जणांना अटक करण्यात आली आहे. आणखी दोन आरोपी फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, २९ एप्रिल रोजी संतोष पाटील यांच्या पत्नी रेखा संतोष पाटील यांनी रायबाग पोलीस ठाण्यात आपल्या पतीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, वकील शिवगौडा पाटील आणि भरत कोळी यांनी त्यांच्या पतीचे अपहरण केल्याचे नमूद करण्यात आले होते.

 belgaum

प्रकरणाचा तपास अथणीचे उपविभागीय पोलिस अधिकारी आणि रायबाग पोलिसांनी एकत्रितपणे हाती घेतला. तपासादरम्यान उदयकुमार या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि इतर सहभागी आरोपींची माहिती उघड केली. त्यानुसार, संजय वन्नूर, रामू दंडापुरे, मंजुनाथ तलवार आणि बसप्पा नायक यांची नावे पुढे आली.

अपहरणाच्या दिवशीच संतोष पाटील यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता. त्यांचा मृतदेह कारवार जिल्ह्यातील रामनगरजवळील जंगलात नेऊन जाळण्यात आला. अनेक दिवसांच्या शोध मोहिमेनंतर मृतदेहाचे अवशेष पोलिसांना सापडले. त्यानंतर अवघ्या ४८ तासांत करण्यात आलेल्या डीएनए चाचणीत हे अवशेष संतोष पाटील यांचेच असल्याचे निष्पन्न झाले.

खुनामागील कारण स्पष्ट करताना पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले की, मृत संतोष पाटील यांचा भाऊ लक्ष्मण पाटील हे वरिष्ठ वकील शिवगौडा पाटील यांच्याकडे सहाय्यक म्हणून कार्यरत होते. या दोघांमध्ये दिवाणी वादातील संपत्ती खरेदीचा व्यवसाय होता. लक्ष्मण पाटील यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या नावावर असलेल्या विजयपूर जिल्ह्यातील इंडी येथील सहा भूखंड आणि एक एकर चार गुंठे जमिनीचा ताबा संतोष पाटील यांनी वहिनीच्या नावे हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला. ही बाब शिवगौडा पाटील यांच्या विरोधात गेल्याने त्यांनी खुनाचा कट रचला.

या कटात शिवगौडा पाटील यांच्यासोबत भरत कोळी, किरण केंपवाडे, सुरेश नंदी, उदय मुशेनवर, संजयकुमार हलबाणावर आणि रामू दंडापुरे या सात जणांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. या सर्वांना अटक करण्यात आली असून, फरार असलेले महावीर हंजे आणि नागराज नायक या दोघांचा शोध सुरू आहे.

या गुन्ह्यामुळे वकिलांच्या विश्वात खळबळ उडाली असून, संपत्तीच्या लालसेपोटी न्यायाच्या रक्षकांनीच कायद्याचा घात केल्याची संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.