बेळगाव लाईव्ह : रस्त्यावरील एलईडी पथदीप दुरुस्त करण्याकडे बेळगाव महापालिका आणि स्मार्ट सिटी लिमिटेडने साफ दुर्लक्ष केल्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावर अंधारात वावरण्याची वेळ ढोर गल्ली, वडगाव येथील रहिवाशांवर आली असून याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
ढोर गल्ली, वडगाव येथील रस्त्यावरील एलईडी पथदीप गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त झाले आहेत. परिणामी रात्रीच्या वेळी ढोर गल्ली परिसरातील रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.
सध्याच्या पावसामुळे खराब झालेले रस्ते आणि घरीच भर अंधार असल्यामुळे रस्त्यावर किरकोळ अपघात व वाहने नादुरुस्त होण्याचे प्रकार घडत आहेत. रस्त्यावरून ये-जा करताना अंधारामुळे विशेष करून महिलांना अनामिक दडपण येत असते. रहिवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी एलईडी पथदीप दुरुस्त करून रात्रीच्या वेळी ढोर गल्ली परिसर प्रकाशमान करावा अशी वारंवार मागणी केली जात आहे.
त्याचप्रमाणे या संदर्भात बऱ्याचदा तक्रार करून देखील महापालिका अथवा बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे सर्व प्रकारचे कर भरून जेवूनही या पद्धतीने मूलभूत नागरी सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याबद्दल ढोर गल्ली परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तरी लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन ढोर गल्ली येथील पथदीप ताबडतोब दुरुस्त करून प्रकाशमान करण्याचे आदेश द्यावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहे.


