बेळगाव लाईव्ह :पुढील वर्षी एप्रिल महिन्यात होणाऱ्या बेळगाव तालुक्यातील कंग्राळी बी के गावाची ग्रामदैवत श्री महालक्ष्मी यात्रेत ग्रामस्थांनी यात्रा आचारसंहिता लागू करून समाजापुढे आदर्श निर्माण करावा अशी मागणी बेळगाव सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी यात्रा कमिटीला लेखी स्वरूपात निवेदन देऊन सदर मागणी करण्यात आली आहे.
यात्रा काळात होणाऱ्या अनिष्ट प्रथा टाळण्यात याव्यात विशेषतः दारू बंदी, आहेर नियंत्रण आणि डॉल्बी ऐवजी सुमंगल वाद्यांचा वापर करावा अशी विनंती सकल मराठा समाजाने केली आहे. काही अनिष्ट प्रथामुळे सामाजिक हिताला बाधा येत आहे त्याच बरोबर ग्रामस्थही आर्थिक अडचणीत सापडत आहेत आणि यात्रेचा मूळ उद्देश्य बाजूला राहून केवळ चंगळवाद चालू राहतो त्यामुळे गावकऱ्यांनी कटाक्षाने काही नियम घालून देऊन यात्रा धार्मिक अध्यात्मिक पर्यावरण पूरक करणे गरजेचे आहे.
यात्रे दरम्यान दारू आहेर आणि डॉल्बी सारख्या कर्णकर्कश वाद्यांमुळे यात्रेचे मंगलमय वातावरण बिघडून जात आहे त्याबरोबरच पैशाचाही अपयव्यय होत आहे म्हणून यात्रा कमिटीने काही मार्गदर्शक तत्वे घालून द्यावीत अशीही विनंती करण्यात आली आहे.

कंग्राळी खुर्द गावाने आपल्या गावच्या वार्षिक देवीच्या यात्रोत्सवात डॉल्बी मुक्त यात्रा करत एक आदर्श संदेश घालून दिला होता त्याच पद्धतीने बी के कंग्राळी गावाने आदर्श यात्रा नियोजन करत तालुक्याला आणि समाजाला आदर्श घालून द्यावा अशी विनंतीही करण्यात आली आहे.
सोमवारी सकाळी श्री महालक्ष्मी मंदिरात यात्रेच्या संकल्प पूजे नंतर सकल मराठा समाजाचे समन्वयक गुणवंत पाटील,सागर पाटील आणि संजय जाधव आदींच्या शिष्टमंडळाने यात्रा,पंच कमिटीची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ पंच कमिटी सदस्य उपस्थित होते.



