बेळगाव लाईव्ह : कर्नाटकचे राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी यांनी वादग्रस्त विधान करत सीमावाद संपुष्टात आल्याचा दावा केला आहे. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) खासदार अरविंद सावंत यांनी कडाडींना कठोर शब्दांत प्रत्त्युत्तर दिले आहे.
खासदार इराण्णा कडाडी यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्ट सांगितले की, मराठी माणूस आपल्या न्यायहक्कांसाठी लढत आहे आणि लढत राहील. त्यामुळे सीमावाद कधीही संपलेला नाही. जोपर्यंत मराठी माणूस न्यायासाठी उभा आहे, तोपर्यंत सीमावाद जिवंत राहील. कडाडी यांनी ही बाब आपल्या डबल इंजिन सरकारला समजावून सांगावी आणि सर्वोच्च न्यायालयातही हीच भूमिका मांडावी. बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर हे मराठी बहुलभाग असून, ते गेल्या सहा दशकांपासून महाराष्ट्रात येण्यासाठी सातत्याने लढा देत आहेत.
हा लढा सामाजिक, राजकीय आणि कायदेशीर पातळीवर सुरू आहे. मराठी भाषिकांच्या मागे अख्खा महाराष्ट्र उभा आहे. केवळ अशी वक्तव्ये करून सीमावाद संपणार नाही. लढण्याची ताकद मराठी माणसाच्या रक्तात आहे, अशा शब्दात खास. अरविंद सावंत यांनी खास. कडाडी यांना फटकारले.

सीमाभागातील मराठी भाषिकांनाही अरविंद सावंत यांनी आवाहन केले. धैर्य दाखवा, एकजूट ठेवा आणि तुमच्या हक्कांसाठी मराठी आमदार, खासदार निवडून द्या. तुम्ही एकत्र राहिलात तर न्याय नक्की मिळेल.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सीमाभागात कायम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, हे विसरू नका. सीमाभागात आमदार, खासदार कडाडी नाही तर मराठी निवडून द्या असा सल्लाही त्यांनी मराठी भाषिकांना दिला.


