बेळगाव लाईव्ह: घर कोसळलेल्या आणि नुकसान भरपाईसाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवणाऱ्या ताशिलदार गल्ली येथील एका वृद्धेला आमदार असिफ (राजू) सेठ यांनी स्वतः जातीने दिलासा देऊन सरकारकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याची व्यवस्था केली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, लक्ष्मी गोविंद मुतकेकर या आजींचे शहरातील ताशिलदार गल्लीमध्ये स्वतःच्या मालकीचे घर आहे. अलीकडे त्या आपल्या मुलीच्या घरी राहण्यास केल्या असता त्यांचे स्वतःचे घर कोसळले आहे. या संदर्भात त्यांनी महापालिका, तहसीलदार वगैरेंकडे नुकसान भरपाईची मागणी करून देखील अद्यापपर्यंत त्यांच्या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही.
घर कोसळून घरातील सर्व चीज वस्तू मातीच्या ढिगार्याखाली गाडल्या जाऊन नष्ट झाल्या असल्यामुळे लक्ष्मी मुतकेकर यांना सध्या वाऱ्यावर पडण्याची वेळ आली आहे. याबाबतची माहिती मिळताच बेळगाव उत्तरचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी स्वतः जातीने वयोवृद्ध लक्ष्मी गोविंद मुतकेकर यांचे विचारपूस केली.
तसेच त्यांची समस्या जाणून घेऊन सरकारकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याची व्यवस्था तर केलीच शिवाय अन्य कांही मदत हवी असल्यास ते करण्याचे आश्वासनही आमदार सेठ यांनी दिले. याप्रसंगी नगरसेवक मुजम्मील डोणी व इतर उपस्थित होते.

नगरसेवक मुजम्मील डोणी यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना कायद्यानुसार लाभार्थींना नुकसान भरपाई, निवृत्ती वेतन वगैरे मंजूर करण्यासंदर्भात तलाठी, तहसीलदार वगैरे सरकारी अधिकाऱ्यांकडून केली जाणारी दिरंगाई, भ्रष्टाचार याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. वयोवृद्ध लक्ष्मी मुतकेकर यांना नुकसान भरपाईसाठी सहा महिन्यापासून सरकारी कार्यालयांचे हेलपाटे घालावे लागत आहेत ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे.
आपल्याकडील प्रत्येक सरकारी कार्यालयामधील अधिकाऱ्यांसाठी जनतेपेक्षा मलिदा लाटणारे एजंट महत्त्वाचे झाले आहेत. त्यांच्याकडून एखादे काम आल्यास ते तात्काळ करून दिले जाते. मात्र जर सर्वसामान्य गरीब जनता थेट एखादे काम घेऊन गेल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडून दिशाभूल करून त्यांना त्रास दिला जातो असा आरोप करून नगरसेवक मुजम्मील डोणी यांनी यासंदर्भात तहसीलदारांवर टीका केली. तसेच हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे, असे मत शेवटी व्यक्त केले.


