बेळगाव लाईव्ह : आजच्या युगात देहदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे प्रतिपादन देहदान चळवळीतील कार्यकर्ते जायंट्स आय फौडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवराज पाटील यांनी केले. ते बेळगांव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत ज्ञान व मनोरंजन कार्यक्रमात बोलत होते.
डॉ.नीता देशपांडे ,डायबेटिस सेंटर, टिळकवाडी येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष विश्वास धुराजी होते.
श्री पाटील यांनी देहदान व अवयव दाना संदर्भातील अनेक गैरसमज दूर केले. मृत्युनंतर केलेल्या नेत्रदानामुळे चार अंध व्यक्ती जग पाहू शकतात तर आगीमध्ये होरपळून निघालेल्या व्यक्तीसाठी त्वचादान खुप उपयुक्त आहे.
देहदानामुळे वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना फार मोठा लाभ होऊ शकतो. श्री पाटील यांनी श्रोत्यांच्या अनेक शंकाचे निरसन केले.
सेक्रेटरी सुरेंद्र देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी 13 जुलै ते 26 जुलै दरम्यान वाढदिवस असणाऱ्या सभासदांना वाढदिवसानिमित्त धुराजी यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
पांडुरंग कारकल यांनी प्रार्थना सादर केली. प्रभाकर देसाई यांनी अध्यात्मिक माहिती दिली. रविंद्रनाथ जुवळी रविंद्र कुंभोजकर,सुरेद्र देसाई, अश्विनी पाटील, अशोक कदम, औदुंबर शेट्ये, विजय वाईगडे,शशिकांत शिंदे योगिनी देसाई व स्नेहलता जुवळी यांनी सुरेल आवाजात मनोरंजनात्मक गाणी सादर केली त्यामध्ये सभासदांनी उत्साहात भाग घेतला. मीना कुलकर्णी यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली


