बेळगाव लाईव्ह : सांबरा विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी कर्नाटक सार्वजनिक बांधकाम विभागाने निलजी-सांबरा रस्त्याचे चार पदरीकरण करण्यास मंजुरी दिली आहे. निलजीला विमानतळाशी जोडणाऱ्या सध्याच्या अरुंद दुहेरी मार्गाच्या दुरुस्तीची जनतेची दीर्घकाळापासूनची मागणी होती, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात मंत्री सतीश जारकीहोळीनी सांगितलॆ कि, ४ किलोमीटरच्या या प्रकल्पासाठी भूसंपादनासाठी १७ कोटी रुपये आणि बांधकामासाठी ५५ कोटी रुपये असे एकूण ७२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या अद्ययावित रस्त्यावर मध्यवर्ती दुभाजक, दुतर्फा पदपथ आणि पथदिवे असतील, अशी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी घोषणा केली आहे.
आम्ही तीन आठवड्यांत भूसंपादन पूर्ण करण्याचे, एका महिन्यात निविदा काढण्याचे आणि चार ते पाच महिन्यांत बांधकाम पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले आहे.” कर्नाटक विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात, म्हणजेच डिसेंबरमध्ये या रस्त्याचे उद्घाटन होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याव्यतिरिक्त, सांबरा विमानतळाला थेट शहर मध्यवर्ती भागाशी जोडणारा उड्डाणपूल बांधण्याचा दीर्घकालीन प्रकल्प प्रगतीपथावर असून, तो दोन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. हा उड्डाणपूल कार्यान्वित झाल्यावर बेळगावमध्ये येणाऱ्या प्रवाशांचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. सध्या, राष्ट्रीय महामार्गापासून निलजीपर्यंतच चार पदरी रस्ता अस्तित्वात आहे.
विमानतळाकडे जाणारा उर्वरित रस्ता अजूनही अरुंद असून, दररोज हजारो वाहने या मार्गाचा वापर करतात, ज्यामुळे वाहतूक कोंडी आणि विलंब होतो. वेगाने वाढणाऱ्या विमानतळाला अधिक सुरळीत आणि सुरक्षित कनेक्टिव्हिटी प्रदान करणे हे प्रस्तावित विकासाचे उद्दिष्ट आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील गांधीनगरजवळील वाहतूक समस्यांवरही प्रकाश टाकला. सध्या, त्या पट्ट्यावर एकच सेवा रस्ता आहे, जो हुबळी-धारवाड, बैलहोंगलहून येणाऱ्या वाहनांसाठी बेळगावमध्ये प्रवेशाचे एकमेव ठिकाण आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अतिरिक्त सेवा रस्त्याची जनतेची वाढती मागणी असून हा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


