बेळगाव लाईव्ह : धारवाडचे अतिरिक्त एसपी नारायण भरमणी यांना मुख्यमंत्र्यांनी भर कार्यक्रमात हात उचलल्याच्या कथित प्रकरणाप्रकरणी मुख्यमंत्र्यांविरोधात एफआयआर दाखल न झाल्याने संतप्त झालेल्या आरटीआय कार्यकर्ते भीमप्पा गडाद यांनी थेट राज्य उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी या संदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांना आणि गृह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून गंभीर परिणामांची पूर्वसूचना दिली आहे.
शनिवारी बेळगाव येथील कन्नड साहित्य भवनात पत्रकारांशी बोलताना गडाद यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाच्या सभेदरम्यान कर्तव्य बजावत असलेल्या धारवाडचे अतिरिक्त एसपी नारायण भरमणी यांना मुख्यमंत्र्यांनी हात उचलून मारहाणीचा प्रयत्न केल्याच्या घटनेचा उल्लेख केला. या प्रकरणी बेळगावच्या कॅम्प पोलीस ठाण्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात तक्रार देऊन एफआयआर दाखल करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, कॅम्प पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी पीडित व्यक्तीने तक्रार दिली नसल्याचे कारण देत एफआयआर दाखल करण्यास नकार दिला, यावर गडाद यांनी तीव्र आक्षेप घेतला.
गडाद यांनी एका वेगळ्या प्रकरणाचा दाखला दिला, ज्यात विधान परिषदेचे सदस्य रविकुमार यांनी राज्याच्या मुख्य सचिवांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्या प्रकरणात पीडित व्यक्तीने तक्रार दिली नसतानाही, सामाजिक कार्यकर्त्यां नागरत्ना यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे एम.एल.सी. रविकुमार यांच्यावर तातडीने एफआयआर दाखल करण्यात आला होता.

या दोन प्रकरणांमधील भिन्नतेवर बोट ठेवत, गडाद यांची मागणी आहे की, मुख्यमंत्र्यांविरुद्धही त्याच धर्तीवर एफआयआर दाखल व्हावा. अन्यथा, मुख्यमंत्र्यांवर एफआयआर दाखल करण्यासाठी पोलीस विभागाला योग्य निर्देश देण्याची मागणी करत उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.
यावेळी गडाद यांनी विरोधी पक्षनेत्यांवरही निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांच्या या कृतीवर ते गप्प का आहेत, असा सवाल करत, त्यांनी विरोधी पक्षांना याविरोधात आवाज उचलण्याचे किंवा राजीनामा देण्याचे आवाहन केले.


