बेळगाव लाईव्ह :कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार 5 गॅरंटी योजनांच्या नावावर सत्तेवर आले. त्यातील एक गॅरंटी 200 युनिटपर्यंत विजबिल माफ ही होती. तथापी आता ती सफशेल फोल ठरली असून विजबिल दरवाढीचा झटका देण्यासह आता ग्राहकांच्या मागे ए.एड.डी.च्या नावे परत डिपॉझिट भरा असा तगादा लावण्यात आला आहे. त्यामुळे तीव्र नाराजी पसरली असून गॅरंटीचे अमिष दाखवून जनतेची लूट करण्याचा काँग्रेस सरकारचा हा प्रकार म्हणजे आवळा देऊन कोहळा काढून घेण्याचीच वृत्ती असल्याचा आरोप शेतकरी नेते राजू मर्वे यांनी केला आहे.
एकीकडे 200 युनिटपर्यंत घरगुती विजबिल माफीची गॅरंटी योजना राबवत असताना आता अचानक वीज दरवाढ करणे आणि भरीसभर म्हणून ए.एड.डी.च्या नावे परत डिपॉझिट भरा म्हणून हेस्कॉम कर्मचारी घरोघरी नोटीस देऊन सही करुन घेऊन जात आहेत. एकिकडे महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यातच विकासाच्या नावे अनेकप्रकारे जनतेची लूट सूरु आहे असेही मर्वे यांनी म्हटले आहे.
घरपट्टी ई.आस्थीच्या नावे लूट, 24 तास पाणी योजनेत लूट, शेतकऱ्यांच्या रासायनिक खतात लूट, वाहन खरेदीत लूट, बँक खात्यात लूट, वाहतूक खात्याच्या लूटीसह इतर अनेक खात्यांच्या लूटमारीने जनता अक्षरशः वैतागली आहे. त्यात आता या हेस्कॉमच्या डिपॉझिटमूळेतर सर्वसामान्य गरीबांचे कंबरडेच मोडणार आहे. आधीच शेतकरी अतिवृष्टीमुळे मोठ्या चितेंत जगत आहे. पीकं खराब झाल्यामुळे दुबार पीकं लावणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आधीच्या खर्चापेक्षा दुप्पट खर्च करावा लागणार आहे.
किसान क्रेडिट कार्ड नसल्याने बँका कर्ज देत नसल्याने घराचे दागिने तारण ठेऊन लावणी करावी लागणार आहे. कर्जमाफी नसल्याने शेतकरी व गरीबांना कोणकोणत्या अडचणीनां तोंड द्यावे हे कळेनास झाले आहे. सरकारने गॅरंटी योजना दिल्या पण शेतकऱ्यांना जगवण्यासाठी कोणतीही गॅरंटी दिली नाही.
बियाणांच्या किमती वाढ, त्यात ती बऱ्याचदा नकली निघतात, अशा अनेक अडचणीनां सामोरं जाणाऱ्या शेतकऱ्यांना व गरीब जनतेला नोटिसद्वारे हेस्कॉमने केलेली डिपॉझिट भरण्याची सक्ती सरकारने ताबडतोब रद्द करुन दिलासा द्यावा. अन्यथा हेस्कॉमच्या या लूटी विरोधात विद्यूत खात्याच्या विरोधात त्रस्त शेतकरी व सर्वसामान्य जनता आंदोलन छेडल्याशिवाय रहाणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.


