बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या सोमवारी रात्रभर आणि काल मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे ओढे-नाले पात्राबाहेर गेल्याने शेती पाण्याखाली जाऊन प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच मणतुर्गा गावाजवळील हालात्री नाल्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने काल मंगळवारी दिवसभर खानापूर -हेम्माडगा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
खानापूर पश्चिम भागात सोमवारी रात्रभर पडणारा संततधार पाऊस काल मंगळवारी देखील सुरूच होता. खानापूर शहरात काल दिवसभर पावसाची रिपरीप सुरू असली तरी पश्चिम भागात पावसाचा जोर कायम होता. तालुक्याच्या जळगे व करंबळ भागातील शेकडो एकर भात शेती पाण्याखाली गेली आहे.
जळगे मार्गावरील शिवारांचे पाणी पुलावर आल्याने जळगे -करंबळ मार्ग रहदारीसाठी कांही काळ ठप्प झाला होता. नेरसा, नलावडे, अशोकनगर, मणतुर्गा भागात पावसाचा जोर सर्वाधिक असल्याने हालात्री नाल्याला पूर येऊन खानापूर -हेम्माडगा मार्गावरील वाहतूक काल मंगळवारी दिवसभर बंद झाली होती.
काल सायंकाळी तर या पुलावर 3 फूट पाणी आले होते. दरम्यान चिखलणी व रोप लावणीच्या कामासाठी शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची गरज होती.
सध्या पडलेल्या संततधार पावसामुळे शिवारे जलमय झाली असून आगामी आठवडाभर रोप लावणीची धांदल उडणार आहे.




