बेळगाव लाईव्ह :कर्नाटक युवा काँग्रेस सरचिटणीस पदी निवड झाल्यानंतर युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्याला सुरुवात केली असून काँग्रेस युवा संघटना अधिक मजबूत करण्याच्या आपल्या मोहिमेला त्यांनी खानापूर येथून प्रारंभ केला आहे.
कर्नाटक युवा काँग्रेस सरचिटणीस पदी निवड झाल्यानंतर युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी बेळगाव जिल्ह्यातील युवक जोडणीची सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने खानापूर तालुक्यात आज मंगळवारी त्यांनी पहिली सभा घेतली. सभेला प्रारंभ करण्यापूर्वी त्यांनी खानापूर शिवस्मारक येथे छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या पद्धतीने शिवरायांना अभिवादन करून काँग्रेस युवा संघटना अधिक मजबूत करण्याच्या आपल्या मोहिमेचा शुभारंभ करणाऱ्या राहुल जारकीहोळी यांनी त्यानंतर सभेला उपस्थित दीडशेहून अधिक युवकांना मार्गदर्शन केले.
काँग्रेस पक्ष संघटना बळकट करण्यासाठी लोकांच्या संपर्कात राहून सतत कार्यरत रहा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ऍड ईश्वर घाडी,जोतिबा गुंटेनांवर आदी उपस्थित होते.
युवा काँग्रेसमध्ये चांगले कार्य करून अनेकांनी मंत्रीपदापर्यंत मजल मारली आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे युवकांनी जनसंपर्क वाढवून युवा काँग्रेसला बळकटी देणे गरजेचे आहे असे सांगून कर्नाटक सरकारने लागू केलेल्या शासकीय योजनांची जनजागृती कशा पद्धतीने करावी, जनतेची सेवा कशी करावी वगैरें बाबत युवा नेते राहुल जारकीहोळी यांनी युवकांना मार्गदर्शन केले.


