बेळगाव लाईव्ह : कित्तूर राणी चन्नम्मा अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी बँकेत अडकलेल्या ठेवी परत मिळवण्यासाठी ठेवीदारांनी आज बेळगावात एक अनोखे आंदोलन केले. ‘जय हो जनता वेदिके’तर्फे आयोजित या निदर्शनात ठेवीदारांनी हातात साडी, बांगड्या, हळद, कुंकू आणि नारळ यांसारख्या ‘ओटी भरण्याच्या’ वस्तू घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आणि व्याजासहित आपल्या पैशांची परतफेड करण्याची मागणी केली.
सदर सहकारी बँकेतील घोटाळ्याला आता ११ महिने उलटले आहेत. ठेवीदारांनी आपल्या कठीण काळात मदतीसाठी या बँकेत पैसे जमा केले होते. परंतु, आता त्यांना त्यांच्या ठेवींच्या तिप्पट किमतीची मालमत्ता स्वीकारण्यास सांगितले जात आहे.
यावर तीव्र आक्षेप घेत ठेवीदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. “आम्हाला कोणतीही जागा किंवा शेती नको, आम्हाला आमचे पैसे व्याजासहित परत हवेत,” अशी मागणी ठेवीदारांकडून यावेळी करण्यात आली.
‘जय हो जनता वेदिके’चे संस्थापक राज्याध्यक्ष शिवानंद हिरेमठ यांनी या फसवणुकीसाठी फेडरेशनलाच जबाबदार धरले. २०२२ मध्ये आयकर विभागाच्या धाडीनंतर लोकांना पैसे काढू नका असे आवाहन करण्यात आले होते.
Lमात्र, आता फसवणूक झालेल्यांना त्यांच्या ठेवीऐवजी जागा देऊ केली जात आहे, असे हिरेमठ यांनी स्पष्ट केले. कर्नाटक राज्य सौहार्द सहकारी संस्था पैसे परत मिळवून देण्यासाठी कोणतीही ठोस पाऊले उचलत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
ठेवीदारांपैकी ८०-९० टक्के लोक सेवानिवृत्त असून ७०-८० वर्षांवरील आहेत. सर्वांना पेन्शन मिळत नाही. थोडे जास्त पैसे मिळतील आणि जीवनात मदत होईल या विश्वासाने आम्ही सेवानिवृत्तीनंतर मिळालेला पीएफ आणि इतर पैसे येथे जमा केले होते. मात्र आता आमच्या पदरी केवळ निराशा पडली आहे अशा शब्दात इतर आंदोलकांनी संताप व्यक्त केला.


