बेळगाव लाईव्ह :कर्नाटक राज्यपालांच्या आदेशावरून धारवाड जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नारायण बरमनी यांच्यासह राज्यातील पोलीस अधीक्षक (बिगर आयपीएस) दर्जाच्या 4 अधिकाऱ्यांची पदोन्नतीसह तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
पदोन्नतीसह बदली झालेल्या अधीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये परमेश्वर हेगडे, रामगोंडा बी. बसरगी, एन. एच. रामचंद्रय्या आणि नारायण बरमनी यांचा समावेश आहे. यापैकी उडुपी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक -2 असणारे परमेश्वर हेगडे यांची बदली दावणगिरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक -1 या पदावर झाली आहे.
त्याचप्रमाणे बेळगाव जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा पोलीस परीक्षाधिकारी -2 असणारे रामगोंडा बी. बसरगी यांची बदली बेळगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक -1 या पदावर, रामनगर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक -2 असणारे एन. एच. रामचंद्रय्या यांची बदली रामनगरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक -1 या पदावर, तर धारवाड जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक असणारे नारायण बरमनी यांची बदली बेळगाव शहराचे डीसीपी अर्थात पोलीस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था) पदी करण्यात आली आहे.
सदर चारही अधिकाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत बदली झालेल्या पदावर कार्यरत राहावे लागणार आहे. कर्नाटक राज्यपालांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या नावे सरकारचे सचिव एम. धनंजय यांनी उपरोक्त बदली आदेश जारी केला आहे.


