बेळगाव लाईव्ह : सवदत्ती तालुक्यातील हूलिकट्टी गावातील शासकीय शाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे खळबळ माजली आहे. पाण्याच्या टाकीत कीटकनाशक मिसळल्यामुळे १२ विद्यार्थ्यांना त्रास होऊन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यातील हूलिकट्टी गावातील जनता वसाहतीतील सरकारी कन्नड माध्यम प्राथमिक शाळेत मंगळवारी दुपारी गंभीर प्रकार घडला. शाळेच्या आवारात असलेल्या वॉटर टँकमधील पाण्यात अज्ञात व्यक्तींनी कीटकनाशक मिसळल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
या पाण्याचे सेवन केल्यानंतर १२ विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना चक्कर येणे, मळमळ, उलटी अशा लक्षणांनी त्रस्त होऊन तातडीने सवदत्ती तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

घटनेची माहिती मिळताच बेळगावचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ईश्वर गडाद, तसेच शिक्षण विभागाच्या डीडीपीआय लीलावती हिरेमठ यांनी रुग्णालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली. सध्या सर्व विद्यार्थी प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती डॉ. गडाद यांनी दिली आहे.
कीटकनाशक पाण्यात कोणत्या उद्देशाने मिसळण्यात आलं, याची चौकशी सवदत्ती पोलीस करत असून गुन्हेगारी हेतूने कोणी हे कृत्य केलं का, याचा तपास सुरू आहे.


