बेळगाव लाईव्ह: शाळेतील मुलांच्या भांडणावरून पालकांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये एक जण जखमी झाल्याची घटना बेळगाव न्यायालय आवारामध्ये आज सोमवारी घडली.जखमीचे नाव जहीर अब्बास हुक्केरी असे आहे.
खटल्याच्या तारखेला हजर राहण्यासाठी बेळगाव न्यायालयाच्या आवारात उपस्थित असलेल्या दोन गटांनी आज सकाळी एकमेकांवर अचानक हल्ला केला. गेल्या चार दिवसांपूर्वी शाळेमध्ये मुलांमध्ये झालेल्या भांडणावरून न्यायालय आवारात त्यांच्या पालकांमध्ये हाणामारी झाली.
यावेळी सोयल इनामदार याच्यासोबत असलेल्यांनी जहीर अब्बास हुक्केरी याच्यावर दगड, विटांनी हल्ला केला. सदर हल्ल्यात जखमी झाल्यामुळे जहीर हुक्केरी याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून मार्केट पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत सदर घटना घडली आहे.

