बेळगाव लाईव्ह :शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत खोदण्यात आलेल्या तलावातील खड्ड्याचा अंदाज न आल्याने दोन बैलांचा पाण्यात बुडवून दुर्दैवी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल खानापूर तालुक्यातील बेकवाड येथे घडली आहे. उमद्या बैलांच्या मृत्यूमुळे लाखो रुपयांचा फटका बसलेल्या शेतकऱ्याला खानापूरचे माजी आमदार अरविंद पाटील यांनी तात्काळ 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे.
बैलांच्या मृत्यूमुळे नुकसान झालेल्या बेकवाड येथील शेतकऱ्याचे नांव गुंजू विठ्ठल पाटील असे आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेतकरी गुंजू पाटील हे शेतवाडी मधील काम आटपून आपली बैलजोडी घेऊन काल बुधवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास बेकवाड येथील आपल्या घराकडे निघाले होते.
त्यावेळी वाटेवर असलेल्या नरेगा अंतर्गत विकसित केलेल्या तळ्यामध्ये ते बैलजोडी धुण्यासाठी घेऊन गेले. बैलांना धुऊन तलावात सोडल्यानंतर अचानक बैलजोडी पुढे गेली आणि तलावातील मोठ्या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे खोल पाण्यात बुडाली.
दोन्ही बैलांना “जु” बांधण्यात आल्याने बैल जोडीला पोहताही आले नाही. या पद्धतीने गुंजू पाटील यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या दोन्ही बैलांचा पाण्यात बुडून गुदमरून अंत झाला. यावेळी धावाधाव करून आसपासच्या नागरिकांच्या मदतीने पाटील यांनी आपल्या दोन्ही बैलांना तलावातून बाहेर काढले, मात्र तोपर्यंत ते गतप्राण झाले होते. सदर घटनेमुळे गुंजू पाटील या शेतकऱ्याचे लाखों रुपयांचे नुकसान झाले असून त्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे. दोन्ही बैलांचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर बेकवाड येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत दोन्ही बैलावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान बैलांचा तलावात मृत्यू झाल्याची माहिती मिळताच खानापूर तालुक्याचे माजी आमदार व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. यावेळी माजी आमदार अरविंद पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे सांत्वन करून त्याला 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देऊ केली. त्याखेरीज शासनाकडून सुद्धा नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली आहे.


