बेळगाव लाईव्ह :पश्चिम घाटासह पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या सततच्या पावसामुळे बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे राकसकोप जलाशय या जुलै महिन्यात गेल्या सोमवारी (14 रोजी) दुसऱ्यांदा तुडुंब झाल्यामुळे जलाशयाचे दोन दरवाजे 7 इंचने उघडून मार्कंडेय नदीच्या पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी नदीला पूर येण्याची शक्यता असल्याने काठावरील शेतकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन कर्नाटक पाणी पुरवठा मंडळाने केले आहे.
यावर्षी सर्वप्रथम गेल्या 2 जुलै रोजी रात्रस्कोप जलाशय तुडुंब भरले होते. त्यानंतर आता गेल्या सोमवारी हे जलाशय तुडुंब भरून पाणी पातळी 2474.40 फुटावर पोचली होती. त्यामुळे सायंकाळी जलाशयाचा दुसऱ्या व पाचव्या क्रमांकाचा दरवाजा 7 इंचाने उघडून मार्कंडेय नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मागील वेळेला हा विसर्ग 4 इंचाने सुरू होता, यावेळी सोमवारपासून 7 इंचाने विसर्ग सुरू झाला आहे.
या विसर्गामुळे नदीला पूर येण्याची शक्यता असल्याने काठावरील शेतकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन कर्नाटक पाणीपुरवठा मंडळाने केले आहे. राकसकोप जलाशय परिसरात गेल्या सोमवारी दिवसभर संततधार पाऊस पडल्याने जलाशय तुडुंब झाले आहे. काल मंगळवारी देखील पावसाचा जोर कायम होता.

परिणामी सोमवारच्या 2474.40 फुटाच्या तुलनेत काल मंगळवारी जलाशयातील पाण्याची पातळी 2474.50 फुटापर्यंत पोहोचली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा या जलाशयात जादा 19 फूट पाणीसाठा आहे. राकसकोप जलाशयाची क्षमता 2476 फूट इतकी आहे.
त्यापेक्षा जास्त पाणी जलाशयात साठल्यास महाराष्ट्रातील शिवारांमध्ये पाणी वाढते. यासाठी खबरदारी म्हणून पाणी पुरवठा मंडळ जलाशयाची पाणीपातळी 2474 फुटांवर पोहोचताच जलाशयातून पाण्याचा विसर्ग सुरू करत असते.




