बेळगाव लाईव्ह : बेळगावसह सीमा भागातील 865 खेडी मराठी बहुभाषिक असल्यामुळे या भागात कन्नड भाषा सक्तीची करणे म्हणजे भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या हक्कावर गदा आणण्यासारखे आहे. तेंव्हा कन्नड सक्तीचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी करण्याबरोबरच, अन्यथा मराठी भाषिकांसमोर रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, सीमाभागने बेळगावच्या महापौरांना दिला आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, सीमाभागच्या शिष्टमंडळाने आज मंगळवारी सकाळी अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील व सरचिटणीस मनोहर हुंदरे यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव महापालिकेला भेट देऊन महापौर मंगेश पवार यांना उपरोक्त मागणी वजा इशाऱ्याचे निवेदन सादर केले. मागील आठवड्यात पार पडलेल्या कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये मराठीसह इतर भाषेतील फलक तसेच शासकीय कामकाजात कन्नड सक्ती तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि बेळगाव मसह 865 खेडी ही बहुभाषिक असून या ठिकाणी कन्नड सक्ती करणे म्हणजे भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या हक्कावर गदा आणण्यासारखे आहे.
तसेच 2004 पासून महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नाचा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही सन्मान करणार आहोत. मात्र दरम्यान बेळगावसह सीमाभागात मराठी भाषिक बहुसंख्य असल्याने बेळगाव महापालिकेचे महापौर म्हणून आपण कन्नड सक्तीचा निर्णय त्वरित मागे घेण्यासाठी प्रयत्न करावेत. भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या उपसचिवांच्या अलीकडच्या बेळगाव भेटीप्रसंगी आम्ही त्यांना या विषयावर निवेदन दिले होते.
त्यावेळी त्यांनी महापालिकेसह जिल्हाधिकार्यांना सूचना केली होती. त्यांच्या सूचनेचा अवमान केला जात असून कन्नड सक्तीच्या माध्यमातून मराठी भाषेला डावलल्यास मराठी भाषिक रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे आपण कन्नड सक्ती त्वरित मागे घ्यावी अशी आपणास विनंती, असा तपशील महापौरांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करण्यापूर्वी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, भागोजीराव पाटील आदींनी बेळगावसह सीमाभागात कन्नड सक्ती कशी अन्यायकारक ठरणार आहे, याची महापौरांना थोडक्यात माहिती दिली. याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, शिवसेनेचे दिलीप बैलूरकर, महेश टंकसाळी यांच्यासह मोतेश बारदेशकर, महादेव पाटील, राजकुमार बोकडे, शिवाजी हावळानाचे, बाबू पावशे, नारायण मुचंडीकर, राजू पाटील, विनायक मजूकर, सुरज जाधव, सुधीर शिरोळे, श्रीकांत नांदुरकर, अनिल देसुरकर, रमेश माळवी आदी समिती कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदन सादर केल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी सांगितले की, बेळगाव महापालिकेमध्ये अलीकडेच कन्नड सक्ती करण्यासाठी कन्नड प्राधिकरणाची जी बैठक झाली त्याच्या विरोधात आम्ही महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने बैठक घेऊन बेळगावचे महापौर आणि इतर लोकप्रतिनिधींना भेटून कन्नड सक्ती तात्काळ थांबवण्यासाठी निवेदन देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आम्ही आज महापौरांना निवेदन सादर केले. बेळगावमध्ये गेल्या 70 वर्षापासून महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिकांचा महाराष्ट्रात जाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्नाचा खटला 2004 साली सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेला असताना आणि न्यायालयाने जोपर्यंत खटल्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत सीमाभागातील परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवावेत असे निर्देश दिले आहेत. मात्र तरीही न्यायालयाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून बेळगाव सह सीमा भागात कन्नड सक्तीचा वरवंटा फिरवून येथील मराठी भाषा, संस्कृती नष्ट करण्याचा घाट रचला जात आहे. त्याला विरोध करण्यासाठीच आज आम्ही महापौरांना निवेदन दिले असून येत्या काळात अन्य लोकप्रतिनिधीनाही ते सादर करून कन्नड सक्ती थांबवण्याची विनंती केली जाईल अशी माहिती देऊन बेळगावसह सीमा भागातील कन्नड सक्ती जर थांबवली नाही तर मराठी भाषिक रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा शुभम शेळके यांनी दिला.
यावेळी .यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर,नगरसेवक शिवाजी मंडोळकर, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, उपाध्यक्ष नारायण मुंचडीकर, महेश टकसाळी, राजकुमार बोकडे,माजी महापौर महेन नाईक,माजी नगरसेवक दिलीप बैलकर, शिवाजी हावळाण्णाचे, महादेव पाटील, चंद्रकांत पाटील, अशोक घगवे,बेळगाव युवा सेनेचे विनायक हुलजी विद्येश बडसकर, सक्षम कंग्राळकर, प्रकाश हेब्बाजी,रमेश माळवी,सागर कणबरकर, महेंद्र जाधव,जोतिबा येळ्ळूरकर,सुधीर शिरोळे, बाबू पावशे, मोतेश बार्देशकर,विजय सांबरेकर,राजू पाटील,सुरज जाधव,सुरज पेडणेकर,अकाश कडेमनी, अशोक सुभेदार, विनायक पवार,राजू पाटील,विनायक मजुकर श्रीकांत नांदुरकर, अनिल देसूरकर,राजू पावले यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


