बेळगाव लाईव्ह : महापौरांच्या अधिकृत वाहनावरील नियमबाह्य नंबर प्लेटचा मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. याच दरम्यान, कन्नड भाषा प्राधिकरणाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत कन्नड सक्तीचा आग्रह पुन्हा एकदा समोर आला आहे, त्यामुळे संपूर्ण प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे.
बेळगाव महापालिकेच्या महापौरांच्या वाहनावर अद्यापही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट नसल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित वाहनाची नोंदणी २०१७ साली झाली असून त्या वेळेपासून एचएसआरपी बंधनकारक आहे. मात्र तरीही जुनीच प्लेट लावून वाहनाचा वापर सुरू असल्याने प्रशासनातील जबाबदार व्यक्तीच कायद्याचे उल्लंघन करत असल्याची टीका होत आहे.
विशेष म्हणजे, नुकतीच कन्नड भाषा प्राधिकरणाची बैठक पार पडली असून त्यात नामफलक, कार्यालयीन पत्रव्यवहार, शासकीय व्यवहारांमध्ये कन्नडचा वापर अनिवार्य करण्यावर भर देण्यात आला. ६० टक्के कन्नड भाषा वापरण्याचे आदेशही पुन्हा एकदा बजावले गेले.

या पार्श्वभूमीवर, कायद्याचे पालन न करणाऱ्या महापौरांबाबत प्रश्न उपस्थित होत असून, जेव्हा शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधीच नियमांकडे दुर्लक्ष करतात, तेव्हा सामान्य नागरिकांकडून शिस्तीची अपेक्षा कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
वाहन कायद्यानुसार एचएसआरपी आवश्यक असून, त्याचे उल्लंघन हे थेट वाहतूक नियमांचे उल्लंघन मानले जाते. तर दुसरीकडे, कन्नड सक्तीच्या नावाखाली सीमावासीयांवर दबाव आणण्याचे प्रकार सुरूच आहेत. त्यामुळे दोन वेगवेगळ्या नियमांच्या अंमलबजावणीत दुजाभाव होतो आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.


