बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द येथील मार्कंडेय नदीपात्रात एका युवकाने दारूच्या नशेत नदीत उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेळगाव तालुक्यातील कंग्राळी गावाजवळ मार्कंडेय नदीत हा प्रकार घडला असून, युवकाचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफ पथकासह पोलीस दलाने युद्धपातळीवर मोहीम सुरू केली आहे.
नदीत उडी टाकणाऱ्या युवकाचे नाव सचिन माने (रा. कंग्राळी) असे आहे. घटनास्थळी दारूची व पाण्याची बाटली तसेच शेंगदाणे आढळून आल्यामुळे सचिनने दारूच्या नशेत नदीत उडी टाकण्याचे कृत्य केले असावे असा कयास आहे.
कंग्राळी गावातील सचिन माने (४५, रा. कंग्राळी खुर्द) या युवकाने दारूच्या नशेत मार्कंडेय नदीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. घटनास्थळी दारूची बाटली, पाण्याची बाटली सापडल्याने तो दारूच्या पूर्ण नशेत असल्याची शक्यता बळावली आहे. नदीत उडी मारण्यापूर्वी त्याने एका व्यक्तीशी दूरध्वनीवर संभाषण केल्याचे समोर आले असून त्याने एका स्थानिक तरुणाच्या मोबाईलवरून फोन केल्यानंतर लगेच नदीत उडी मारली. यामुळे या घटनेमागील गूढ अधिक वाढले आहे.

या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन माने नदीत पडताच तिथे उपस्थित असलेल्या दोन तरुणांनी त्याला वाचवण्यासाठी तात्काळ धाव घेतली. त्याला वाचवण्याचा प्रयत्नदेखील केला, परंतु त्या युवकाने त्याला प्रतिसाद न दिल्याने तो नदीच्या जोरदार प्रवाहात वाहत गेला.
ही घटना एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, ही घटना ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने काकतीचे सीपीआय शिंगे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी तात्काळ एसडीआरएफ पथकाला पाचारण करत बोटीच्या साहाय्याने युवकाचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. ही घटना आत्महत्येचा प्रयत्न आहे की, आणखी काही, हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल.


