Friday, December 5, 2025

/

खासदार कडाडींवर प्रकाश मरगाळेंचा हल्लाबोल

 belgaum

बेळगाव लाईव्ह : “सीमाप्रश्न केव्हाच संपला आहे,” असे वक्तव्य करणारे खासदार कडाडी यांच्या विधानाचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे मत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केले आहे. कडाडी जिल्हा परिषदेचे सदस्य असल्यापासून मराठी भाषिकांची संख्या आणि जिल्हा परिषदेतील मराठी सदस्यांची माहिती असतानाही त्यांचे हे वक्तव्य निषेधार्ह आहे, असे प्रकाश मरगाळे म्हणाले.

प्रकाश मरगाळे यांनी कडाडींवर हल्लाबोल करताना म्हटले की, ज्या माणसाचा जन्मही झाला नव्हता, त्याच्या आधीपासून हा सीमाप्रश्न अस्तित्वात आहे. त्यामुळे त्यांना या प्रश्नावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. खासदार कडाडी आणि बेळगावचे भाजपचे दोन्ही खासदार हे मराठी भाषिकांच्या मतांमुळेच खासदार झाले आहेत. यापूर्वीच्या खासदारानेही असेच वक्तव्य केले होते, आणि बेळगावचे आताचे विद्यमान खासदार यांनी एकेकाळी बेळगावच्या जनतेला “कन्नड शिका नाहीतर बेळगावातून चालते व्हा,” असे म्हटले होते. तरीही मराठी जनतेने त्यांना निवडून दिले आहे. मराठी माणसांच्या जीवावर निवडून येऊन त्यांच्याविरोधात वक्तव्ये होणे दुर्दैवी आहे. त्यामुळे मराठी जनतेने अशा लोकांना ओळखून त्यांना महापालिका, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत निवडून आणताना शंभर वेळा विचार करावा.

प्रकाश मरगाळे यांनी पुढे आवाहन केले की, यापुढे मराठी माणसांनी अत्यंत सावधगिरीने पाऊले टाकत मराठीचा आदर करणाऱ्या, मराठी अस्मिता जपणाऱ्या लोकांनाच निवडणुकीत मदत करावी, अन्यथा आपले मत ‘नोटा’ला द्यावे. परंतु अशा ‘निर्लज्ज’ लोकांना मतदान करू नये. कारण, सीमाप्रश्न न्यायालयात असताना हे सरकार उघडपणे आपली बाजू मांडत नाही. केंद्रातील भाजप सरकारनेही सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नी आपली बाजू स्पष्टपणे मांडून हा प्रश्न निकालात काढण्यासाठी मदत केली पाहिजे. हे सोडून बेळगावातील या पक्षाच्या नेतेमंडळींचा फक्त मराठी जनतेवर टीका करणे हाच एक धंदा झाला आहे. त्यामुळे मराठी जनतेने आता अधिक शहाणे होण्याची गरज असून, कोणाला निवडून आणायचं अथवा कोणाशी कसं वागायचं हे ठरवणे काळाची गरज आहे. यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनीही “सीमा प्रश्न संपला आहे” असे म्हटले आहे. अलीकडील उदाहरण द्यायचे झाल्यास, महापालिकेतील मराठी फलक काढण्यात आले किंवा ते झाकले गेले, त्यावेळी भाजप, काँग्रेस अशा एकाही राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याने तोंड उघडले नाही. नागरी सुविधा, विकास कामे वगैरे उपलब्ध करून देऊन सरकार आमच्यावर मेहेरबानी करत नाही; ते सर्व काही आमच्याच कररुपी पैशातून होत असते हे मराठी जनतेने लक्षात घेऊन आपला स्वतंत्र बाणा जपला पाहिजे. महाराष्ट्र एकीकरण समिती एक संघटना असून, जी मराठी माणसासाठी लढत आहे. आज सीमाभागात मराठी माणूस आपली मराठी भाषा जाहीरपणे बोलू शकतो ते फक्त महाराष्ट्र एकीकरण समिती जिवंत असल्यामुळेच बोलू शकतो. अन्यथा या भागात मराठी बोलण्यावरही कर्नाटक सरकारची बंदी घालण्यापर्यंत मजल गेली असती.

 belgaum

भाषिक अल्पसंख्यांक आयोगाकडे केलेल्या तक्रारी संदर्भात बोलताना प्रकाश मरगाळे म्हणाले की, “महापालिकेतील मराठी नामफलक हटवण्यासंदर्भात आम्ही यापूर्वीही आयोगाकडे तक्रार केली होती आणि कालही केली आहे. दरवेळी कन्नड सक्तीच्या विरोधात आम्ही ही तक्रार करत असतो, मात्र या संदर्भात पाठपुरावा करण्यात महाराष्ट्रातील आमचे खासदार अपुरे पडतात हे आमचे दुर्दैव आहे.” जर खासदारांनी लोकसभेच्या या अधिवेशनात हा मुद्दा लावून धरत भाषिक अल्पसंख्यांक आयोगाने दिलेल्या 40 अहवालांच्या प्रती सादर केल्या पाहिजेत, अशी त्यांची मागणी आहे. यासंदर्भात आज आमच्याच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तथ्य समितीचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राने नेमलेल्या खासदारांनी एकदाही लोकसभेत आवाज उठवलेला नाही. लोकसभेत दरवेळी शिवसेना हा प्रश्न उपस्थित करत असते, तसे न होता महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी या सीमाप्रश्नासंदर्भात आवाज उठवला पाहिजे किंवा आवाज उठवणाऱ्या खासदाराच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे मत प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.