महापालिकेची श्री गणेशोत्सवाच्या मराठी फलकांवर वक्रदृष्टी;

0
17
 belgaum

बेळगाव लाईव्ह :श्री गणेशोत्सव ऐन तोंडावर येऊन ठेपला असताना मराठीद्वेषाने पछाडलेल्या बेळगाव महापालिकेची वक्रदृष्टी आता शहरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांनी उभारलेल्या मराठी फलकांवर पडली आहे. “फलक फक्त मराठीत आहे, कन्नड शब्द त्यावर नाहीत,” असे कारण देत महापालिकेने काल शुक्रवारी पाटील गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा शहीद भगतसिंग चौकातील मराठी फलक हटविला. खरंतर 60 टक्के कन्नड भाषेच्या सक्तीचा आदेश केवळ व्यापारी आस्थापनांपुरता मर्यादित असतानाही महापालिकेने शहरात मनमानी सुरू केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गणेशोत्सव एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. शहरातील श्री गणेशोत्सव मंडळांनी पाटपूजा करून आगमन सोहळ्याची तयारी सुरू केली असून ठिकठिकाणी फलक उभारले आहेत. तथापी या फलकांवर आता महापालिकेची वक्रदृष्टी पडली आहे. कर्नाटक सरकारने व्यापारी आस्थापन कायद्यानुसार दुकानांवर असलेल्या नामफलकांवर 60 टक्के कन्नड भाषेची सक्ती केली आहे.

व्यापारी आस्थापनांपुरता मर्यादित असणारा हा आदेश इतर जाहिरातींना किंवा जाहिरात फलकांना शुभेच्छा फलकांना लागू होत नाही. तथापि या आदेशाचा बाऊ करत महापालिकेने शहरातील सरसकट सर्वच मराठी फलक हटविण्याचा सपाटा सुरू केला आहे. खेदाची बाब म्हणजे या मनमानी कृतीचे समर्थनही केले जात आहे. दरवर्षीप्रमाणे पाटील गल्ली येथील श्री सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळाने चार दिवसांपूर्वी पाठ पूजन केल्यानंतर नेहमीप्रमाणे शहीद भगतसिंग चौकात बाप्पाच्या आगमन सोहळ्याचा मराठी भाषेतील फलक उभारला होता.

 belgaum

हा फलक मराठीत गोष्टी महापालिकेने हटवून जप्त केला. फलक हटवणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांना मंडळाचे पदाधिकारी व गणेश भक्तांनी जाब विचारला. व्यापारी आस्थापनांना लागू असलेला नियम धार्मिक कार्यक्रमांना का लावण्यात येत आहे? असा सवाल करण्यात आला. त्यावर “तक्रार आली असून आम्ही फक्त वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत आहोत,” असे उत्तर देऊन मनपा कर्मचाऱ्यांनी काढता पाय घेतला. तथापि कोणी तक्रार केली हे तर स्पष्ट झालेच नाही शिवाय तक्रार केली तरी कायदा काय म्हणतो? याचेही उत्तर कोणाकडे नाही.

बाप्पाच्या स्वागताचा फलक हटवल्याची माहिती मिळताच मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी आदींनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन महापालिकेच्या मनमानी कारवाईचा निषेध केला. तसेच घडल्या प्रकाराची माहिती महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांना देण्यात आली.

शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी अलीकडेच घेतलेल्या बैठकीमध्ये श्री गणेशोत्सव काळात मराठी फलक हटवण्यात येऊ नये तशी मागणी उपस्थित गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती. आता दोन दिवसांत शहापूर विभाग गणेशोत्सव मंडळाची बैठक होणार आहे. पण, गणेशोत्सव ऐन तोंडावर असताना महापालिकेने मात्र भाषिक रंग देत मराठी फलकांना लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे प्रकरण तापण्याची चिन्हे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.