बेळगाव लाईव्ह :रस्त्यावरील पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था न केल्यामुळे खानापूर -हेम्माडगा -अनमोड मार्गावरील मनतुर्गा नजीकच्या रेल्वे अंडरपास भुयारी मार्गाच्या ठिकाणी जवळपास 3 फूट पाणी साचले असून अवजड वाहने वगळता या मार्गावरील इतर वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे. परिणामी वाहनचालकांची गैरसोय होत असून रेल्वे खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ताबडतोब भुयारी मार्गावर साचलेल्या पाण्याच्या निचऱ्याची सोय करावी, अशी मागणी केली जात आहे.
मनतुर्गा नजीकच्या रेल्वे अंडरपास भुयारी मार्गाची अलीकडेच निर्मिती करण्यात आली आहे. निर्मिती वेळी जाणकार नागरिकांनी भुयारी मार्ग सखल असल्यामुळे पावसाळ्यात या मार्गावर पाणी साचण्याची शंका व्यक्त करून त्यासाठी पाण्याचा निचरा करण्याची सोय अत्यावश्यक असल्याची सूचना केली होती. तथापि रेल्वे खात्याच्या संबंधित अधिकारी, अभियंता आणि ठेकेदाराने त्याकडे दुर्लक्ष करून पाणी निचऱ्याची सोय न करता भुयारी मार्गाचे काम पूर्ण केले.
परिणामी नागरिकांची शंका खरी ठरली असून कालपासून मनतुर्गा परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे येथील शेतवडींमध्ये तुडुंब भरून ओसंडून वाहणारे पाणी या भुयारी मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

सदर मार्गाला सध्या तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून अवजड वाहतूक करणारी वाहने या पाण्यातूनच वाहतूक करीत आहेत. रस्ता जवळपास 3 फूट पाण्याखाली गेल्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी हा मार्ग पूर्णपणे बंद झाला असून त्यांची मोठी गैरसोय होत आहे. या वाहन चालकांना असोगा, मनतुर्गा मार्गे प्रवास करावा लागत आहे.
रेल्वे खात्याच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ परिस्थितीची पाहणी करून शेतवडीतील पाणी अन्य मार्गाने वळविल्यास या भुयारी मार्गावर पाणी साचणार नाही व वाहतूक सुरळीत होईल, असे मत स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमधून व्यक्त होत आहे.
तेंव्हा रेल्वे खात्याच्या अधिकाऱ्यांनी मनतुर्गा नजीकच्या रेल्वे अंडरपास भुयारी मार्गावर निर्माण झालेल्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तिचे निवारण करण्यासाठी तात्काळ क्रम हाती घ्यावेत, अशी मागणी केली जात आहे.


