बेळगाव लाईव्ह :मलप्रभा जलाशयात सध्या 25 टीएमसी पाण्याचा साठा असल्यामुळे जुलै अखेरपर्यंत जनावरं व लोकांना पिण्यासाठी 20 टीएमसी पाणी ठेवून उर्वरित 4.5 टीएमसी पाणी शेतीसाठी अनुकूल व्हावे यासाठी आज 18 जुलैपासून पुढील 17 दिवस मलप्रभा जलाशयाच्या आसपासच्या कालव्यांमध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मलप्रभा पाणी पुरवठा सल्लागार समितीच्या अध्यक्ष आणि महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.
बेळगाव उत्तर विभाग मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयामध्ये आज शुक्रवारी आयोजित मलप्रभा पाणी पुरवठा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. सध्या कालव्यामध्ये पाणी सोडले असते शेतकऱ्यांना अनुकूल होणार असून शेतकऱ्यांनीही याचा सदुपयोग करून घ्यावा. येत्या दिवसांमध्ये पाऊस झाला नाही तरी पाण्याची कमतरता भासणार नाही.
मात्र तोपर्यंत शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर योग्य रीतीने केला पाहिजे. मलप्रभा जलाशयाच्या आसपासच्या प्रदेशातील यंदाच्या वर्षातील हंगामी कालव्यांमध्ये पाणी सोडण्याच्या पार्श्वभूमीवर मलप्रभा योजनेअंतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील आमदार आणि शेतकऱ्यांची बैठक घेऊनच कालव्यात पाणी सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे, असे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.
मलप्रभा पाणीपुरवठा सल्लागार समितीच्या आजच्या बैठकीस नरगुंदचे आमदार सी. सी. पाटील, बदामीचे आमदार चिमनकट्टी आदी लोकप्रतिनिधी संबंधित सदस्य उपस्थित होते.

