बेळगाव लाईव्ह : बेळगाव-जांबोटी-चोर्ला-गोवा मार्गावरील कुसमळी पुलाला लागून असलेल्या रस्त्यावरील चिखलात एक ट्रक अडकल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे पुलावर अनेक वाहने अडकून पडली असून, प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.
शुक्रवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार कुसमळी पुलाचे बांधकाम अजूनही अर्धवट आहे आणि बरेच काम बाकी आहे. या मार्गावर अवजड वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली होती. मात्र, काही दिवसांपासून प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे आणि निष्काळजीपणामुळे या मार्गावर अवजड वाहतूक सुरू करण्यात आली होती.
याच निष्काळजीपणाचा परिणाम म्हणून आज कुसमळी पुलाला लागून असलेल्या रस्त्यावर ट्रक अडकला आणि जांबोटी तसेच गोव्याकडे जाणारी तसेच बेळगावकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

या मार्गावरून अवजड वाहतूक सुरू केल्याने पुलाला धोका निर्माण झाला असून, भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला प्रशासनच जबाबदार असेल, असे संतप्त नागरिकांचे म्हणणे आहे.
या घटनेमुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. बेळगाव चोर्ला कुसुमळी मार्गे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते त्यातच सध्या वाहतूक टप्पे झाल्याने प्रवाशातून देखील मोठी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.


