मराठी नगरसेवकांविरोधात करवेचा थयथयाट

0
6
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील भाषिक वाद आणि मातृभाषेसाठी लढा देणारे मराठी भाषिक सीमावासीय यांच्यावर नेहमीच वक्रदृष्टी ठेवून वागणारे कर्नाटक रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते, कन्नड संघटना आणि मराठीद्वेष्ट्या मूठभर कार्यकर्त्यांमुळे बेळगावच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर नेहमीच परिणाम होत आला आहे. मात्र ‘चोराच्या उलट्या बोंबा’ या उक्तीप्रमाणे कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते नेहमीच मराठी भाषिकांच्या, नेत्यांच्या आणि संघटनांच्या मागे थयथयाट करताना दिसून येतात.

आज गुरूवारी देखील बेळगाव महानगरपालिकेत मराठी भाषेत सभेचा इतिवृत्तांत मागणाऱ्या नगरसेवकांविरोधात अशाचपद्धतीची गरळ कर्नाटक रक्षण वेदिकेच्या नारायण गौडा गटाने ओकण्यास सुरुवात केली असून घटनात्मक अधिकारांतर्गत मातृभाषेतून व्यवहाराची मागणी करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांच्या हद्दपारीची केविलवाणी मागणी करण्यात आली आहे.

बेळगाव महानगरपालिकेच्या गुरुवारी पार पडलेल्या सभेत मराठी भाषेत सभेचे इतिवृत्त देण्याची मागणी नगरसेवक रवी साळुंखे यांनी केली होती. यादरम्यान सभागृहात झालेला गदारोळ पाहून तसेच वारंवार मागणी डावलत असल्याचे दिसून येताच रवी साळुंखे यांनी सभात्याग केला होता. या घटनेनंतर करवे कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेसमोर जमून निदर्शने केली. नगरसेवक रवी साळुंखे यांना तात्काळ हद्दपार करावे, अशी मागणी करत महानगरपालिकेसमोर धरणे धरले.

 belgaum

राज्यात ६० टक्के कन्नड भाषेची सक्ती करण्यात येत असताना सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, शिवसेनेचे नेते याविरोधात जात असल्याचे कारण देत रवी साळुंखे यांच्यासह इतर नेत्यांनाही हद्दपार करण्यात यावे, अशी मागणी करवे कार्यकर्त्यांनी केली आहे.

वारंवार भाषिक अल्पसंख्यांक कायदा, हक्क आणि अंमलबजावणी यासंदर्भात दाखले आणि पुरावे देऊनही कोणत्याही गोष्टीचा अभ्यास न करता केवळ ‘आले घोड्यावर अन गेले…..’ अशी अवस्था असणाऱ्या तथाकथित कन्नड संघटनांच्या मूठभर कार्यकर्त्यांना सीमाभागातील कोणत्याच गोष्टीचे भान राहिले नाही, हेच यावरून दिसून येते.

मराठी भाषिक, मराठी नेते, मराठी संघटना आजवर कायद्याचे उल्लंघन करून कोणत्याच गोष्टी करण्यास पुढे आले नाहीत. सीमाभागातील मराठी भाषिकांचे प्रत्येक आंदोलन,लढे हे कायद्याच्या चौकटीत राहूनच होत आले असून कायद्याने दिलेले हक्क मिळविण्यासाठी यापुढील काळात देखील अशाचपद्धतीने आपल्या भूमिकेवर ठाम राहतील, यात तिळमात्र शंका नाही. मात्र अशा गोष्टींचा अभ्यास नसणाऱ्या कन्नड संघटनांच्या मूठभर कार्यकर्त्यांनी माकड उड्या न मारता सीमाभागातील वातावरण सलोख्याचे ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, हीच अपेक्षा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.