बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेत भाषिक सक्तीवरून नवा वाद सुरू झाला आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाने कन्नड सक्तीला विरोध दर्शवत महापौरांना निवेदन दिल्यानंतर, आता कन्नड संघटनांनी मराठी भाषेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
बेळगाव महानगरपालिकेत कन्नड फलक, कन्नडमध्ये व्यवहार आणि कन्नडमध्येच प्रशासन चालवण्याची सक्ती करावी, अशी मागणी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या बेळगाव जिल्हा शाखेने गुरुवारी महापौर मंगेश पवार यांच्याकडे केली आहे.
कर्नाटक रक्षण वेदिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपली मागणी महापौरांना सादर केली. यावेळी महापौरांनी निवेदन स्वीकारत, कन्नड सक्तीसंदर्भात आवश्यक कार्यवाही केली जात असल्याचे सांगितले.
बेळगाव महानगरपालिकेत सरकारच्या आदेशानुसार कन्नड सक्तीची अंमलबजावणी केली जात असून, कन्नड विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षांनीही पालिकेला भेट देऊन कन्नड फलक लावण्याबरोबरच कन्नड कलिका केंद्र सुरू करण्याचे पाऊल उचलले आहे, असे महापौर म्हणाले.
निवेदनात कर्नाटक रक्षण वेदिकेने स्पष्ट केले आहे की, जरी बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांनी कन्नड सक्तीच्या विरोधात महापौरांची भेट घेतली असली तरी, महापालिकेत कन्नड सक्ती कायम ठेवावी. समितीच्या लोकांचे ऐकून कन्नडचा अपमान होईल अशी कोणतीही गोष्ट महापालिकेत घडल्यास, करवेचे कार्यकर्ते पालिकेला घेराव घालून कठोर धडा शिकवतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच, बेळगाव महानगरपालिकेत कन्नडविरोधी गोष्टी सुरू राहिल्यास सरकार महानगरपालिका बरखास्त करेल, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन सादर करताना उपमहापौर वाणी जोशी देखील उपस्थित होत्या.
दरम्यान, बुधवारी अन्य एका कन्नड संघटनेने जिल्हाधिकारी, महापौर आणि मनपा आयुक्तांना निवेदन सादर करून महाराष्ट्र एकीकरण समितीला रोखण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर मराठी भाषिकांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची इतरत्र बदली करावी, अशीही मागणी करण्यात आली. यापूर्वी गेल्या मंगळवारी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखालील माजी नगरसेवक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी महापौरांना कन्नड सक्ती थांबवण्याची विनंती केली होती.
बेळगाव शहरासह परिसरात मराठी भाषिकांची संख्या अधिक असल्यामुळे त्यांनी भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचा आधार घेत ही मागणी केली होती. मात्र, यामुळे कन्नड संघटनांची ‘कोल्हेकुई’ सुरू झाली असून, शांतताप्रिय बेळगाव शहरात पुन्हा एकदा नाहक भाषिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे दिसते.


