बेळगाव लाईव्ह : गोव्यामध्ये कन्नड भवन उभारण्याच्या दिशेने कर्नाटक सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कर्नाटक सीमा प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अनुदानातून गोव्यामध्ये कन्नड भवन बांधण्यासाठी कर्नाटक सरकारने खासगी जागा खरेदी केली आहे.
कर्नाटक सीमा प्रदेश विकास प्राधिकरण, बेंगळुरूचे अध्यक्ष सोमण्णा बेविनमरद यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रकाश मत्तीहल्ली, कर्नाटक सीमा प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या उपस्थितीत बुधवारी पणजी राष्ट्रीय महामार्ग, वर्णा जंक्शन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत सिद्धण्णा मेट्टी, कन्नड साहित्य परिषद, गोवा गडिनाडू गट, हनुमंत रेड्डी शिरूर, तवरप्पा, राजेश शेट्टी, तडीवाळ, शिवानंद बिंगी आणि गोव्यातील इतर कन्नड समर्थक संस्थांचे अध्यक्ष/सदस्य सहभागी झाले होते. २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात “गोव्यात कन्नड भवन” बांधण्याची घोषणा करण्यात आली होती.

सुमारे ६ लाखांहून अधिक कन्नड भाषिकांसाठी गोव्यामध्ये कन्नड भवन उभारण्याची अंमलबजावणी करण्यासाठी गेल्या चाळीस वर्षांपासून गोवा कन्नडिगांकडून विनंत्या येत होत्या.
यानुसार सीमाभागातील कन्नड भाषिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण करत गोव्यामध्ये कन्नड भवन बांधण्यासाठी कर्नाटक सरकारने खासगी जागा खरेदी केली आहे.


