बेळगाव लाईव्ह :माजी सैनिक संघटनेच्या महासंघातर्फे कारगिल विजयोत्सव आणि ऑपरेशन सिंदूर विजयोत्सवाच्या निमित्ताने बेळगाव शहरामध्ये आयोजित भव्य बाईक रॅली आज शनिवारी सकाळी उत्साहात पार पडली.
माजी सैनिक संघटनेच्या महासंघातर्फे आज एका भव्य कार्यक्रमाद्वारे कारगिल आणि ऑपरेशन सिंदूर विजयोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्ताने सकाळी बाईक रॅली अर्थात दुचाकी आयोजन करण्यात आले होते.
शहरातील भुईकोट किल्ला येथे बेळगाव भाजप शाखेचे सरचिटणीस मुरुगेंद्र पाटील यांच्या हस्ते सदर बाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी माजी सैनिक संघटनेचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष जगदीश पुजारी, उपाध्यक्ष संगप्पा मेटी, रमेश चौगुले, सरचिटणीस शिवबसप्पा काडण्णवर, संतोष हिरेमठ, गणपती देसाई, सुरज पाटील, सुनिता पट्टणशेट्टी, संतोष मठपती, आदींसह माजी सैनिक संघटनेचे अन्य पदाधिकारी आणि सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
किल्ला येथून सुरू झालेली ही बाईक रॅली मध्यवर्ती बस स्थानक, क्रांतिवीर संगोळी रायण्णा चौक, कित्तूर राणी चन्नम्मा चौक, डॉ. आंबेडकर उद्यान मार्गे धर्मनाथ भवन येथे समाप्त झाली. बाईक रॅली दरम्यान दुचाकींवर तिरंगा फडकवण्याबरोबरच भारत माता की जय, वंदे मातरम् असा जयघोष करण्यात येत होता.


