बेळगाव लाईव्ह :स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत विकसित केलेल्या पायाभूत सुविधांची चांगली देखभाल सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वाचा निर्णय घेताना बेळगाव स्मार्ट सिटी अभिवृद्धी संघाने कलामंदिर, टिळकवाडी येथील बहुउद्देशीय व्यापारी संकुल 11 वर्षांसाठी भाडेपट्ट्यावर देण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकारी आणि बेळगाव स्मार्ट सिटी अभिवृद्धी संघाचे अध्यक्ष मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. कलामंदिर बहुउद्देशीय व्यापारी संकुलासाठी योग्य भाडेकरू निवडण्याकरिता लवकरच निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार असून ज्यामध्ये स्पष्ट अटी आणि शर्ती निश्चित केल्या जाणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निविदा प्रक्रिया अंतिम करणे, अपेक्षित वार्षिक महसूल आणि संपूर्ण इमारत किंवा वैयक्तिक दुकाने भाडेपट्ट्यावर द्यायची की नाही? यावर चर्चा झाली. शेवटी संपूर्ण कॉम्प्लेक्स एकाच संस्थेला भाडेपट्ट्यावर देण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस महापालिका आयुक्त शुभा बी., स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालिका आफरीनबानो बळ्ळारी, डॉ. संजय डुमगोळ आदी उपस्थित होते.
ठरलेल्या आर्थिक मॉडेलनुसार या संकुलाच्या भाडेपट्ट्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या 50 टक्के रक्कम भविष्यात स्मार्ट सिटी प्रकल्पांचे व्यवस्थापन आणि ते टिकवून ठेवण्यासाठी बेळगाव स्मार्ट सिटी अभिवृद्धी संघाला देण्यात येईल. त्याचप्रमाणे उर्वरित 50 टक्के रक्कम महानगरपालिकेला देण्यात येईल. स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत बांधण्यात आलेल्या या व्यापारी संकुलाचे बांधकाम 2020 मध्ये सुरू झाल्यानंतर कायदेशीर अडचणींमुळे विलंब झाला होता.
अखेर दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. तेंव्हापासून त्याचा वापर आणि व्यवस्थापन याबाबत चर्चा सुरू आहेत. दरम्यान स्मार्ट सिटी योजनेतील कामांची देखभाल करण्यासाठी अभिवृद्धी संघ स्थापन करण्याचा निर्णय आधी झाला.
त्यानंतर या संघाच्या बैठकीत आधी कलामंदिर बहुउद्देशीय व्यापारी संकुलाबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर बुधवारी झालेल्या बैठकीत संकुल भाडे कराराने देण्याचा निर्णय घेण्यात आला.


