बेळगाव लाईव्ह : कर्नाटकचे राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी यांनी “बेळगावचा सीमाप्रश्न केव्हाच संपला आहे,” असे वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कडाडींचे हे विधान ‘बालिश’ आणि ‘अकलेचे तारे तोडणारे’ असल्याचे शेळके यांनी म्हटले. त्यांच्यासारखे अनेक जण यापूर्वी आले आणि गेले, असा इतिहास असल्याचे सांगत शेळके यांनी कडाडींना राजकीय अस्तित्वावर घाव घातल्याचा इशारा दिला.
युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना कडाडींच्या वादग्रस्त विधानाचा निषेध केला. “बेळगावचा मराठी माणूस इतका स्वाभिमानी आहे की, आणखी ७० वर्षे जरी गेली, तरी सीमाप्रश्नाच्या चळवळीसाठी प्राणपणाने लढायला आमची तयारी आहे,” असे ते म्हणाले. कडाडींनी ‘मागच्या दाराने’ राज्यसभा गाठल्याचा उल्लेख करत, जनतेतून निवडणूक लढवून दाखवण्याचे आव्हान शेळकेंनी दिले.
बेळगावचा खरा विकास महानगरपालिकेत महाराष्ट्र एकीकरण समिती सत्तेवर असतानाच झाल्याचा दावा शेळके यांनी केला. कडाडींनी खासदारीत कोणते मोठे प्रकल्प आणले, असा सवाल करत, विद्यमान खासदार बेळगावचे प्रकल्प हुबळी-धारवाडला पळवत असल्याचे म्हटले. भाजपमधील मराठी माणसांनी कडाडींना जाब विचारण्याचे आवाहनही शेळकेंनी केले.

सीमाप्रश्नाच्या चळवळीसाठी शेकडो लोकांनी बलिदान दिले असून, हा लढा मराठी माणसाच्या हक्काच्या महाराष्ट्रात सामील होईपर्यंत थांबणार नाही, असे शेळके यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी स्वतःच्या खासदारकीच्या निवडणुकीचे उदाहरण देत, सीमाभागातील लढा लोकसहभागातूनच उभा राहतो, असे स्पष्ट केले.
अशा बालिश वक्तव्यांमुळे सीमाभागात वातावरण तणावपूर्ण होते, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय पक्षांमध्ये काम करणाऱ्या मराठी बांधवांनी प्रादेशिक विषयांवर एकजूट दाखवावी, अशी अपेक्षा शेळके यांनी व्यक्त केली.


